सातारा : चालकाचा ताबा सुटल्याने लोखंडी दुभाजक तोडून जीप थेट सेवारस्त्यावर येऊन पडल्याची घटना सोमवारी दुपारी पुणे-बंगलोर महामार्गावर खेड गावच्या हद्दीत घडली. या अपघातात चालक जखमी झाला असून, त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.कऱ्हाड येथील कुटुंब जीपमधून (एमएच ०६ ९८९४) सोमवारी दुपारी पुण्याकडे निघाले होते. प्राथमिक माहितीनुसार जीपमध्ये चालकाव्यतिरिक्त आणखी चौघेजण होते. बारा वाजण्याच्या सुमारास महामार्गावर खेड गावच्या हद्दीत हॉटेल महेंद्र एक्झिक्युटिव्हसमोर जीप आली असता, चालकाचे जीपवरील नियंत्रण सुटले. जीप भरधाव वेगात असल्याने कडेच्या लोखंडी दुभाजकावर जाऊन धडकली. दुभाजक तोडून ती सेवारस्त्यावर आली आणि दोन-तीन पलट्या खाल्ल्याने कारचा चक्काचूर झाला. चालक सागर श्रीरंग साळेकर (वय २१, रा. मुंबई) हा अपघातात जखमी झाला. त्याला उपचारार्थ येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)तिघीजणी जखमीरिक्षाला जीपने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात रिक्षातील प्रवासी महिला आणि दोन पादचारी मुली अशा तिघीजणी जखमी झाल्या. जिल्हा परिषद चौकात सोमवारी दुपारी हा अपघात झाला. तेजल राजेंद्र बर्गे (वय १८), काजल संभाजी वीर (१९, दोघी रा. कोरेगाव) आणि नीलम सुरेश चव्हाण (४६, रा. विकासनगर, खेड) अशी जखमींची नावे आहेत. रिक्षा पोवई नाक्याकडे येत असताना स्कॉर्पिओ जीपने रिक्षाला पाठीमागून धडक दिल्याने नीलम चव्हाण जखमी झाल्या. त्या रिक्षातून प्रवास करीत होत्या. दरम्यान, या धडकेने रिक्षा पुढील बाजूस फेकली गेल्याने तेजल बर्गे आणि काजल वीर या पादचारी युवती जखमी झाल्या.
दुभाजक तोडून कार सेवारस्त्यावर
By admin | Published: January 05, 2016 12:46 AM