कऱ्हाड : येथील पालिकेने शहरात ठिकठिकाणी बसवलेले सिमेंटचे बाकडे तुटले आहेत. बाकडे तुटल्याने ज्येष्ठ नागरिकांना बसण्याची सोय नाही. हे बाकडे तातडीने बदलण्याची मागणी होत आहे. काही बाकडे तुटल्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत. याबाबत पालिकेने योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.
वेलींचा विळखा
कऱ्हाड : कऱ्हाड ते पुसेसावळी मार्गावर असलेल्या दिशादर्शक फलकांना झुडुपांसह वेलींनी विळखा घातला आहे. त्यामुळे हे फलक असून, अडचण, नसून खोळंबा बनले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने फलकांवर वाढलेली झुडुपे व वेली हटवावीत, अशी मागणी वाहन चालकांतून केली जात आहे.
गटर तुंबली
कऱ्हाड : शहरातील मंडई परिसरात असलेली गटर सातत्याने तुंबलेल्या अवस्थेत असून, त्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. मंगळवारी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानंतर पावसाचे पाणी नाल्यांमधून प्रवाहित झाले नाही. परिणामी मंडईत अनेक ठिकाणी तळे साचले होते. गटर तुंबल्याने परिसरात दुर्गंधीही पसरत असून, पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी स्वच्छता करावी, अशी मागणी होत आहे.
विजेचा खेळखंडोबा
कऱ्हाड : गत आठवड्यापासून तालुक्यात वारंवार पाऊस पडत आहे. विजांच्या कडकडाटासह जोरदार वारा सुटत असल्यामुळे अनेक गावांतील वीजपुरवठा खंडित होत आहे. या खंडित वीजपुरवठ्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले असून, वीज कंपनीने पावसाळ्यापूर्वी तांत्रिक दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी केली जात आहे.