सातारा : वाळू वाहतुकीवर कारवाई न करण्यासाठी खासगी व्यक्तीकरवी दहा हजारांची लाच मागणाऱ्या तलाठ्यासह एकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.शहापूर, ता. सातारा सजाचा तलाठी अमोल देशमुख (वय ३५), खासगी व्यक्ती अविनाश माने (रा. कृष्णकुंज अपार्टमेंट स्वराज नगर, गोडोली, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती, संबंधित तक्रारदाराचा वाळू वाहतुकीचा व्यवसाय आहे. त्याच्या पकडलेल्या वाहनावर भविष्यात कारवाई न करण्यासाठी शहापूर सजाचा तलाठी अमोल देशमुख याने ९ फेब्रुवारी २०१० रोजी खासगी व्यक्ती अविनाश माने याच्याकरवी बसस्थानकासमोरील तलाठी भवनामध्ये दहा हजारांची मागणी केली होती.
त्यानंतर संबंधित तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रितसर लेखी तक्रार केली. त्यानुसार लाचलुचतपच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता तलाठी देशमुख आणि खासगी व्यक्ती माने हा लाच मागत असल्याचे निष्पन्न झाले. या दोघांना पकडण्यासाठी दुसऱ्या दिवशी लाचलुचतपच्या अधिकाऱ्यांनी सापळा लावला. मात्र, त्यांना कदाचित भणक लागल्याने त्यांनी लाच स्वीकारली नाही.
परिणामी पडताळणीमध्ये लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तब्बल महिनाभरानंतर दोघांवर लाच मागणीचा गुन्हा शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत या दोघांनाही अटक झाली नव्हती.