सातारा : व्यवसाय सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला देण्यासाठी १० हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. यामध्ये रासाटी, ता. पाटणच्या महिला सरपंच, एक ग्रामपंचायत सदस्य आणि एका खासगी व्यक्तीच्या विरोधात रात्री उशिरापर्यंत कोयनानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.याबाबत माहिती अशी की, तक्रारदार यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला द्यायचा होता. त्यासाठी १५ हजार रुपयांची मागणी रासाटीच्या सरपंच सुरेखा बंडू कदम, ग्रामपंचायत सदस्य सचिन नथूराम कदम व खासगी व्यक्ती बंडू दाजी कदम यांनी केल्याची तक्रार सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्राप्त झाली होती. त्यानुसार मंगळवारी पडताळणीमध्ये सरंपच सुरेखा कदम, ग्रामपंचायत सदस्य सचिन कदम यांनी तडजोडीअंती १० हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली होती.
तसेच सचिन कदमने लाचेची रक्कम स्वीकारली. तसेच खासगी व्यक्ती बंडू कदम (रा. रासाटी) याने लाच मागण्यास प्रोत्साहन दिले. यावरुन तिघांच्या विरोधात कोयनानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक अविनाश जगताप, हवालदार भरत शिंदे, संजय साळुंखे, प्रशांत ताटे, श्रध्दा माने, विशाल खरात, तुषार भोसले, नीलेश येवले, मारुती अडागळे आदींनी कारवाईत सहभाग घेतला.