सातारा : नोटाबंदीमुळे भल्याभल्यांना जेरीस आणलंय. उद्योगधंदे व्यवसायही डबघाईला आले. एकंदरीत सारेच ठप्प असताना दुसरीकडे मात्र, लाचखोरी मात्र तेजीत असल्याचे पाहायला मिळतेय. आतल्या हाताने कमाई करणारे जेव्हा सापडतात तेव्हा तोच चोर म्हणून पुढे येतो. पण असे कितीतरी चोर आहेत जे सापडत नाहीत. पण लाच घेण्यात तरबेज आहेत. असे लोक आता लाचलुचपतच्या रडावर आहेत.
अनेकांची जवळपास दीड वर्षे कोरानातच गेली. परिणामी सततच्या लाॅकडाऊनमुळे व्यावसायिकांबरोबरच नागरिकही हतबल झाले. पण संचारबंदीतही लाचखोरी मात्र, जोमात सुरू असल्याचे पाहायला मिळाले. महसूल, पोलीस तसेच नगर पालिका विभागातील क्लासवन अधिकाऱ्यांपासून चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांपर्यंत सारेचजण यात अडकल्याचे पाहायला मिळाले. लोकांच्या असाह्यतेचा फायदा घेऊन लाचखोरांनी आपली उरली सुरलीही इज्जत घालवून टाकली. लाॅकडाऊन आणि संचारबंदीमुळे लाचखोरीच्या कारवाया कमी होतील, असे अधिकाऱ्यांना वाटत होते. पण अधिकच वाढल्याचे त्यांच्या लक्षात आले.
चाैकट : महसूल विभाग सर्वात पुढे
महसूल विभागामध्ये नागरिकांचा सततचा संपर्क येत असतो. जमिनीचे वाद, वारसनोंदी अशा प्रकारची सततची कामे महसूल विभागात असतात. कार्यालयात कामे घेऊन येणारे हे सर्वसामान्य शेतकरी असतात. या शेतकऱ्यांचे अज्ञात हेरून त्यांच्याकडे पैशांची मागणी केली जाते. एखादा शेतकरी चाणाक्ष्य निघाल्यासच तो लाचलुचपतकडे धाव घेतो. अन्यथा निमूटपणे पैसे देऊन आपले काम मार्गी लावण्यास शेतकरी प्राधान्य देतो.
चाैकट : दोन हजारांपासून साडेतीन लाखांपर्यंत..
जमिनीचा सातबारा उतारा व सर्च रिपोर्ट देण्यासाठी दोन हजारांची लाच घेताना मसूरच्या तलाठ्याला रंगेहाथ पकडण्यात आले होते. अशा प्रकारचे उतारे व नोंदी करण्यासाठी तलाठी पैसे घेत असल्याचे अनेकदा निष्पन्न झाले आहे. मात्र तरीसुद्धा हे प्रकार अद्यापही थांबलेले नाहीत.
त्याचबरोबर गुटख्याच्या दाखल असलेल्या केसमध्ये मदत करण्यासाठी तसेच जामिनावर सोडण्यासाठी २० हजारांची लाच घेताना कोरेगावच्या सहायक पोलीस निरीक्षकाला रंगेहाथ पकडले होते.
कोट : तुमचं काम पूर्ण करून देण्याची जबाबदारी आमची...
लाॅकडाऊन काळातही लाचलुचपत विभागाने कारवाया केल्या आहेत. शासकीय कार्यालयामध्ये कुठेही पैसे मागितले तर नागरिकांनी पुढे येऊन तक्रार देणे गरजेचे आहे. तुम्ही तक्रार दिल्यानंतर तुमचे कामाची अडवणूक होइल, असं अनेकांना वाटतं. पण असं होत नाही. तुमचं काम योग्य असेल तर ते पूर्ण करून देण्याची जबाबदारी आमची असेल. त्यामुळे न घाबरता लाचखोरांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पुढे या.
आकडेवारी.....
वर्षे -लाचखोरी
२०१६ - २८
२०१७ - २९
२०१८ - २९
२०१९ - २७
२०२० - २३
२०२१ - १०