सातारा : जिल्हा जात पडताळणी समितीमधील हवालदाराच्या डोक्यात वीट घालून जखमी केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. या वादावर आता पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते काय भूमिका घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
नितीन अंकुश माने (रा. रहिमतपूर, ता. कोरेगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस निरीक्षकाचे नाव आहे.याबाबत हवालदार राम मुकाप्पा कोळी (वय ३०, रा. जवान हाउसिंग सोसायटी, सदरबझार, सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. कोळी यांची पोलीस मुख्यालयात नेमणूक आहे. सध्या त्यांना प्रतिनियुक्तीवर जिल्हा जात पडताळणी समितीमध्ये नेमणूक देण्यात आली आहे. नितीन माने हे त्या ठिकाणी पोलीस निरीक्षक म्हणून काम करत आहेत. कोळी यांनी फियार्दित म्हटले आहे, बुधवार, दि. ११ रोजी माने यांनी जात पडताळणी समितीच्या कार्यालयामध्ये वाद घालत मला शिवीगाळ केली. ‘तुला दाखवतोच, तुझी नोकरी घालवतो, मी पोलीस निरीक्षक आहे. मी काही केले, तरी माझे कोण काय करणार नाही,' अशा धमक्या त्यांनी दिल्या. त्यानंतर औद्योगिक वसाहत पोलीस चौकीच्या रस्त्याने जात असताना रस्त्याच्या कडेला पडलेली वीट माने यांनी डोक्यात व उजव्या हातावर मारून जखमी केले.
पोलीस निरीक्षकानेच हवालदाराला मारहाण केल्यामुळे जिल्हा पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. शुक्रवारी दिवसभर या प्रकरणाचीच चर्चा करताना पोलीस पाहायला मिळत होते. याबाबत अधिक तपास हवालदार शेवाळे हे करत आहेत.