कऱ्हाड : रूळ ओलांडताना रेल्वेच्या धडकेत दुचाकीस्वार दाम्पत्य जागीच ठार झाले. कऱ्हाड तालुक्यातील कार्वेचौकी येथे शनिवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. राजेंद्र विठ्ठल फसाले (वय ३५) व वैशाली राजेंद्र फसाले (२५, रा. वांगी, ता. कडेगाव) असे रेल्वेच्या धडकेत मृत्युमुखी पडलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, वांगी येथील राजेंद्र फसाले यांच्या बहिणीचे कार्वे (ता. कऱ्हाड) हे सासर आहे. शनिवारी दुपारी राजेंद्र व त्यांची पत्नी वैशाली हे दुचाकीवरून कार्वे येथे आले होते. बहिणीला भेटल्यानंतर राजेंद्र व वैशाली परत दुचाकीवरून वांगीला जाण्यासाठी निघाले. कार्वेहून वांगीला जाण्यासाठी कार्वेचौकी, शेणोली मार्गे सोनसळ घाटातून मार्ग आहे. या मार्गावरून जाताना कार्वेचौकी येथे रेल्वेरूळ ओलांडावा लागतो. संबंधित ठिकाणी गेट नाही. मात्र, स्थानिकांसह अनेकजण तेथूनच कच्च्या रस्त्यातून रूळ ओलांडतात. राजेंद्र व वैशाली हेसुद्धा त्याच मार्गाने वांगीला निघाले होते. रूळ ओलांडण्याच्या ठिकाणी रस्त्याला चढ आहे. त्यामुळे राजेंद्र यांनी दुचाकीची गती वाढविली. याचवेळी कोल्हापूरहून अहमदाबादला निघालेली रेल्वे राजेंद्र यांच्या निदर्शनास आली नाही. त्यामुळे रेल्वेची दुचाकीला जोराची धडक बसली. ही धडक एवढी भीषण होती की, राजेंद्र व वैशाली दुचाकीसह दूरवर फेकले गेले. दुर्घटना निदर्शनास येताच परिसरातील ग्रामस्थांनी तत्काळ त्याठिकाणी धाव घेतली. मात्र, रेल्वेच्या धडकेत राजेंद्र व वैशाली यांचा जागीच मृत्यू झाला होता. (पान १ वरून) तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, सहायक निरीक्षक स्वप्निल लोखंडे, विवेक पाटील, फौजदार भरते, हवालदार चोरगे यांनी अपघातस्थळाला भेट दिली. तसेच रेल्वे पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा झाल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी कऱ्हाडच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. तीन मुले निराधार पसाले दाम्पत्याची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. मोलमजुरी करून ते उदरनिर्वाह करीत होते. राजेंद्र यांच्या पश्चात आई-वडील, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. मोठी मुलगी ज्योती आठ वर्षांची, दुसरी मुलगी संस्कृती सहा वर्षांची, तर मुलगा संस्कार तीन वर्षाचा आहे. पसाले दाम्पत्याच्या मृत्यूने त्यांची तीन मुले निराधार झाली आहेत. रेल्वेरुळावर हद्द कुणाची? च्संबंधित अपघात रेल्वेरुळावर झाला असल्याने तो रेल्वे पोलिसांच्या अखत्यारित की कऱ्हाड तालुका पोलिसांच्या, असा पेच निर्माण झाला होता. च्रात्री उशिरापर्यंत त्याबाबत कोणताही निर्णय झाला नव्हता. अपघाताची नोंद कोठे करायची, याबाबत अधिकाऱ्यांची चर्चा सुरू होती. बहिणीचा आक्रोश अपघाताची माहिती मिळाल्यानंतर राजेंद्र यांची बहीण व इतर नातेवाईक कार्वेतून त्वरित कार्वेचौकी येथे पोहोचले. त्यावेळी भाऊ व वहिनीचा मृतदेह पाहून बहिणीने आक्रोश केला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर सायंकाळी वांगी येथील नातेवाईकही अपघातस्थळी पोहोचले होते. वांगी परिसरावर शोककळा वांगी : रेल्वे अपघातात राजेंद्र पसाले व वैशाली पसाले हे दाम्पत्य ठार झाल्याचे वृत्त वांगी गावात समजताच परिसरावर शोककळा पसरली. राजेंद्र पसाले आई-वडिलांपासून विभक्त झाल्याने वांगी गावातच पत्नी व तीन मुलांसह स्वतंत्र राहत होते. त्यांना शनिवारीच सोसायटीचे कर्ज मंजूर झाले होते. त्यातून काही जणांची उधारी भागवून पत्नी वैशालीला पैंजण खरेदी केले होते. त्यानंतर दोघे पती-पत्नी धानाई-कार्वे येथे आजारी असलेल्या नातेवाइकास पाहण्यासाठी सकाळी तीन वर्षांच्या मुलाला घेऊन दुचाकीवरून गेले होते. तेथील नातेवाइकांच्या घरात मुलाला ठेवून ते दुसऱ्या नातेवाइकांकडे जात असताना रेल्वे रुळावर रेल्वेने ठोकरल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
रेल्वेची दुचाकीला धडक बसून वांगीचे दाम्पत्य ठार
By admin | Published: October 03, 2015 11:07 PM