पाचवड : कळंभे-महिगाव या गावांना जोडणारा धोम उजव्या कालव्याच्या मुख्य कॅनॉलवर असलेला पूल जीर्ण झाल्यामुळे रविवारी (दि. २४) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास कोसळला. धोम धरण निर्मितीवेळी बांधण्यात आलेला हा पूल सुमारे ४० ते ४५ वर्षांपूर्वीचा होता. पाटबंधारे खात्याने वेळोवेळी डागडुजी न केल्यामुळे तसेच यावरून रहदारी वाढल्यामुळे पूल अत्यंत जीर्ण झालेला होता.
गणपती माळावर असलेल्या या पुलावरून कळंभे गावाबरोबरच खर्शी, महिगाव व कुडाळ गावांमधील शेतकऱ्यांची शेतमालाची वाहतूक चालते. जीर्ण पुलाचे नव्याने काम करण्यासाठी कळंभे ग्रामस्थांनी अनेकदा धोम पाटबंधारे विभागाच्या आनेवाडी व वाई कार्यालयाला निवेदने दिली होती. मात्र या दोन्ही कार्यालयांतील अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा करीत कळंभे ग्रामस्थांच्या निवेदनाला केराची टोपली दाखवल्यानेच आज हा पूल ढासळला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
या पुलावरून शेतकऱ्यांच्या ऊस पिकाबरोबरच इतर मालाची ने-आण करावी लागत असल्याने या पुलाचे नव्याने बांधकाम होत नाही, तोपर्यंत शेतकºयांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने लवकरात लवकर नवीन पुलाची उभारणी करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रकाश बाबर, बंडा शिवथरे, आदिनाथ गायकवाड, दिनकर शिवथरे, बळवंत गायकवाड, संग्राम शिंगटे, लक्ष्मण जाधव, महेंद्र मोहिते, नितीन शिवथरे, संतोष गायकवाड, बापू वाघ व कळंभे ग्रामस्थांनी दिला आहे.सध्या धोम उजवा कालव्याला पाणी सोडण्यात आलेले आहे. पुलाचा ढासळलेला भाग कालव्यामध्ये कोसळल्याने मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले गेले आहे. पाटबंधारे विभागाकडून यावर त्वरित कार्यवाही न झाल्यास येथील कॅनॉलला मोठे भगदाड पडून आसपासची शेतजमीन पाण्याखाली येण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.