म्हसवड : ‘मोठ्या विश्वासाने म्हसवडकर जनतेने पालिकेची सत्ता परिवर्तन पॅनलच्या हाती दिली. शहरात विकास कामांचा डोंगर उभा करण्याचे स्वप्न जनतेला दाखवत चार वर्षांहूनही अधिक काळ उपनगराध्यक्ष असलेल्या स्नेहल सूर्यवंशी यांच्याविरोधात सोमवार, दि १८ रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास ठराव दाखल करणार आहे. याबाबत सदस्यांच्या सहीचे पत्र देणार आहे,’ अशी माहिती पालिकेचे गटनेते धनाजी माने यांनी दिली.
म्हसवड येथे आयोजित पत्रकात परिषदेत माने यांनी म्हटले आहे की, ‘म्हसवडच्या जनतेने पालिकेची सत्ता परिवर्तन पॅनलच्या हाती दिली. त्यावेळी सत्ताधारी गटाकडून उपनगराध्यक्ष पदासाठी दरवर्षी एकाला संधी देण्याचे सर्वानुमते ठरले होते. पहिल्या वर्षासाठी सविता म्हेत्रे, दुसऱ्या वर्षी स्नेहल सूर्यवंशी, तिसऱ्या वर्षी हिंदमालादेवी राजेमाने, चौथ्या वर्षी गणेश रसाळ, व पाचव्या वर्षी धनाजी माने असे पक्षप्रमुखांच्यासमोर झालेल्या बैठकीत ठरलेले होते. मात्र पहिल्याच वर्षी स्नेहल सूर्यवंशी यांनी उपनगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरला. त्यापूर्वी ठरल्याप्रमाणे सविता म्हेत्रे यांनीही अर्ज दाखल केला होता. उपनगराध्यक्ष पदावरुन पहिल्याच दिवशी पार्टीत फूट पडू नये म्हणून सर्व प्रमुख मंडळींनी एकत्र बसून सविता म्हेत्रे यांना अर्ज काढावयास लावला. एक वर्ष पूर्ण झाल्यावर सूर्यवंशी यांना उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा मागितल्यावर सूर्यवंशी यांनी राजीनामा देण्यास नकार दिला. पुन्हा फूट नको म्हणून पार्टीतील प्रमुख मंडळींच्या सांगण्यावरुन आजवर शांत होतो मात्र ४ वर्षांत एकही काम उपनगराध्यक्षांनी न करता प्रतिष्ठेपायी पद अडवण्यात धन्यता मानली आहे.
‘उपनगराध्यक्षांच्या एकाधिकारशाहीला सर्व नगरसेवक कंटाळलेले आहेत. त्यांच्या हट्टामुळे शहराचे नुकसान झाले आहे. सत्ताधारी परिवर्तन पॅनलचा गटनेता म्हणून मलाही शेवटच्या वर्षी उपनगराध्यक्ष पदाची संधी देण्याचे सर्वांनी बैठकीत मान्य केलेले आहे. असे असताना उपनगराध्यक्षांना राजीनामा मागितला असता प्रत्येकवेळी त्यांनी मला संख्याबळ दाखवा म्हणून हिणवले. माझ्याकडील संख्याबळ किती आहे हे दाखवण्यासाठीच पालिकेतील सर्व सदस्यांशी बोलणी केली असून सर्वांनीच यासाठी आपणाला पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळेच आपण उपनगराध्यक्षांवर अविश्वास ठराव दाखल करुनच संख्याबळ दाखवून देणार आहे,’ असेही माने म्हणाले.
यावेळी नगराध्यक्ष तुषार विरकर, नगरसेवक गणेश रसाळ, दीपक बनगर यासह सुरेश पुकळे, राहुल म्हेत्रे उपस्थित होते.
चौकट
सत्ताधारी सदस्य धनाजी मानेंसोबत : विरकर
म्हसवड पालिकेतील गटनेते धनाजी माने हे एक अजातशत्रू असल्यानेच पालिकेतील सर्व सदस्य त्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. वेळप्रसंगी ते धनाजी माने यांच्याच बाजूने मतदानही करतील,’ असा विश्वास नगराध्यक्ष तुषार विरकर यांनी व्यक्त केला.