कुडाळ : सातारा, मेढा, महाबळेश्वर रस्त्यावर दिवसेंदिवस वाहतूक वाढत आहे. या रस्त्यावर ब्रिटिशकालीन १६ पूल आहेत. यामधील काही पूल हे वाहतुकीस धोकादायक ठरत होते. अशा ब्रिटिशकालीन पुलांच्या दुरुस्तीच्या कामास बांधकाम विभागाने सुरुवात केली आहे. वेण्णानगर, सावली पुलाचे काम नव्याने करण्यात आले असून, उर्वरित पुलांचे प्रस्ताव बांधकाम विभागाने तयार केले असून, हा रस्ता आता चकाचक होऊन वाहतुकीसाठी सुलभ झाला आहे.मेढा मार्गे महाबळेश्वरला जाण्यासाठी जवळचा मार्ग असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक दिवसेंदिवस वाढतच आहे. या मार्गावर ब्रिटिशकालीन अरुंद असे काही ठिकाणी पूल आहेत. यापैकी सावली, वेण्णानगर येथील पूलाची नव्याने रुंदी वाढवून सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधले आहेत. उर्वरित पुलांचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे मोरावळे ते भणंग यादरम्यान व मोळाचा ओढा ते कोंडवे दरम्यान रस्त्याला अधिक खड्डे होते. त्यामुळे या ठिकाणचा रस्ता डांबरीकरण करण्यात आला आहे. रस्त्यावरील पुलांच्या दुरुस्तीमुळे रस्ता डांबरीकरणामुळे रस्ता वाहतुकीस सुलभ झाला आहे. त्यामुळे प्रवाशांमधून वाहनचालाकतून समाधान व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)वाहतूक सुलभ होणार...मेढा मार्गे असणाऱ्या या रस्त्यावर भणंग ते रिटकवली दरम्यान चढ-उतार होते. त्यामुळे समोरील वाहन पटकन नजरेत येत नव्हते. असे झिगजॅक बांधकाम विभागाने कमी केले आहेत. तर कोंडवे येथे होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रस्ता रुंदीकरण प्रस्ताव तयार केला आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीस अधिक सुलभ होणार आहे.सातारा ते मेढा महाबळेश्वर राज्यमार्गावर जवळपास १६ ब्रिटिशकालीन पूल आहेत. यापैकी दोन पूल बांधण्यात आले आहेत. तर कोंडवे येथील पुलाचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. हे पूल देखील रुंद करण्यात येणार आहेत.- जे. डी. पाटील, बांधकाम उपअभियंता, जावळी
ब्रिटिशकालीन पुलांना मिळतेय झळाळी!
By admin | Published: February 19, 2015 9:38 PM