या ब्रिटिशकालीन पुलाचे गतवर्षी मजबुतीकरण करण्यात आले आहे. मात्र, फक्त दुचाकी व पादचार्यांनाच हा पूल खुला करण्यात आला होता. त्यानतंर या पुलावरुन हलक्या वाहनांची वाहतूक सूरू केली जावी, अशी मागणी होत होती. शिवाय पुलाच्या मजबुतीकरणानंतर हलक्या वाहनांची वाहतूक सुरू होणार असल्याचेही सांगण्यात आले होते. मात्र पुलाची वजन तपासणी झाली नसल्याने गेली अनेक दिवस या पुलावरुन फक्त दुचाकी वाहने सुरू होती. आता या जुन्या पुलाची स्पॅन लोड टेस्ट करण्यात येणार आहे. रविवार, दि. २४ व सोमवार, दि. २५ रोजी ही तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी दोन दिवस पूल पूर्णपणे वाहतुकीस बंद करावा लागणार आहे. ही तपासणी झाल्यानंतर या पुलावरून हलक्या वाहनांची वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे. पुलावर काम सुरू होणार असल्याने दुचाकी वाहतूक तसेच पादचारी मार्ग बंद केल्याशिवाय काम करता येत नसल्याने हा पूल दोन दिवस बंद ठेवण्यात यावा, असे पत्र बांधकाम विभागाने पोलीस प्रशासनाला दिले आहे. त्यामुळे रविवार व सोमवारी जुना कोयना पूल सर्वप्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. पर्यायी वाहतूक महामार्गावरील नवीन कोयना पुलावरून सुरू राहणार आहे.
कऱ्हाडचा ब्रिटिशकालीन पूल दोन दिवस वाहतुकीसाठी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 4:40 AM