कुसूर : कराड तालुक्यातील कोळे पंचायत गणात कृष्णा कारखाना निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याअगोदरपासूनच इच्छुक उमेदवारांना निवडणुकीचे वेध लागले आहेत. मात्र सत्ताधारी पॅनलविरोधात महाविकास आघाडी होणार की स्वतंत्र निवडणूक लढविली जाणार यावर जरी शिक्कामोर्तब झाला नसला तरी इच्छुक उमेदवारांची भाऊ गर्दी दिसून येत आहे. मात्र या गणातील सभासद संख्या पाहता इच्छुकांची इच्छा पूर्ण होईल का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
विंग जिल्हा परिषद गटात ऐकून २५९७ सभासद आहेत. कोळे पंचायत गणातील सहा गावांतील सभासद संख्या ८८२ आहे. दोन अंकी सभासद संख्या असलेल्या गावातील इच्छुक उमेदवारांची संख्या फार दिसून येत आहे. मात्र विंग पंचायत गणातील सभासद संख्या १७१५ आहे. ही संख्या पाहता कोळे गणातून उमेदवारी दिलेल्या उमेदवारांना सभासद किती पसंती देतील सांगणे कठीण आहे.
कृष्णा कारखाना निवडणुकीसाठी विंग जिल्हा परिषद गटातून एक उमेदवार दिला जातो. मात्र आजवर सभासदांनी निवडून दिलेल्या उमेदवारांनी सभासदांच्या समस्या सोडविण्यासाठी किती प्रयत्न केले. हे निर्णायक ठरणार आहे. या अगोदर निवडून दिलेल्या संचालकांनी सभासदांसाठी काय योगदान दिले, कशी वागणूक दिली हे सर्वांना ज्ञात आहे. परिणामी राजकीय नेत्यांना हाताशी धरून सत्ता बदल झाले असले तरी यावेळी याचा फारसा उपयोग होईलच हे सांगता येणार नाही.
चौकट : कृष्णा कारखाना कार्यक्षेत्र असलेल्या कोळे गणात आजमितीस अनेकांनी सत्ता भोगली आहे. मात्र या अगोदर सत्तेत असलेल्या सत्ताधाऱ्यांचे एखादे गाव वगळता अन्य गावांतील सभासदांशी कधी सलोख्याचे संबंध जुळून आले नाहीत. त्यामुळे राजकीय नेत्यांना हाताशी धरून नेत्यांनी दिलेल्या उमेदवारांना निवडून देऊन सभासदांनी सत्ता बदल केले आहेत. मात्र सध्या कारखान्यात सत्ता असलेल्या डाॅ. अतुल भोसले यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कोळे गणात शिरकाव करत पक्कड मजबूत केली आहे. याचा फायदा त्यांना होऊ शकतो.