कराड : कोरोना दहशतीच्या परिस्थितीतही कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. एक जूनपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. त्यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुकांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. इच्छुकांची भाऊगर्दी पॅनल प्रमुखांची, नेत्यांची डोकेदुखी ठरत आहे.
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक २९ जून रोजी होत आहे. २४ मे रोजी याचा अधिकृत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून २५ मे पासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आतापर्यंत ६ जणांनी अर्ज दाखल केले आहेत, तर १२७ अर्जांची विक्रीही झाली आहे. १ जूनपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे, तर १७ जूनला अर्ज माघार घेण्याची शेवटची तारीख आहे. निवडणुकीचे अंतिम चित्र याच दिवशी स्पष्ट होणार आहे.
कारखान्याची निवडणूक दुरंगी की तिरंगी होणार, याचे चित्र अजूनही स्पष्ट नाही; पण माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजीत मोहिते व अविनाश मोहिते यांच्या मनोमिलनासाठी वरिष्ठ नेत्यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत, तर डॉ. सुरेश भोसले व डाॅ. अतुल भोसले यांच्या सहकार पॅनलची एकला चलो रे भूमिका दिसत आहे.
सध्या कारखान्यात डॉ. सुरेश भोसले यांच्या सहकार पॅनलची सत्ता आहे. साहजिकच त्यांच्याकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे नव्या-जुन्यांचा मेळ कसा घालायचा याची कसरत त्यांना करावी लागणार आहे. इच्छुकांनीही यासाठी मोठी फिल्डिंग लावली असून डॉ. भोसले यांच्या कार्यालयात इच्छुकांची समर्थकांसह गर्दी पाहायला मिळत आहे.
दुसरीकडे मोहितेंचे मनोमिलन करायचे म्हटले तर तेथेही उमेदवारी निश्चिती हाच महत्त्वाचा प्रश्न निर्माण होत आहे. मुळातच दोघांकडे इच्छुक अनेक आहेत. त्यातून २१ उमेदवार निश्चित करणे ही बाब त्यांच्यासाठीही डोकेदुखी ठरत आहे.
चौकट
विद्यमान संचालकच पुन्हा इच्छुक ..
कारखान्यात डॉ. सुरेश भोसले यांचे बहुमत आहे, तर अविनाश मोहिते व सहकारी संचालक विरोधी बाकावर आहेत. होऊ घातलेल्या निवडणुकीतही दोन्ही गटांचे संचालक आपापल्या पॅनलमधून पुन्हा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. त्यांना डावलणे नेत्यांसाठी निश्चितच अडचणीचे ठरत आहे.
फोटो
कृष्णा कारखाना संग्रहित फोटो वापरणे