पिंपोडे बुद्रुक : पिंपोडे बुद्रुक (ता. कोरेगाव) येथे ज्वारी काढण्यासाठी गेलेल्या युवकाचा डोक्यात व तोंडावर अज्ञाताकडून खलबत्याच्या ठोंब्याने घाव घालून निर्घृण खून केल्याची घटना घडली. शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली. भगवान मच्छिंद्र सपकाळ (वय २४, रा. पिंपोडे बुद्रुक) असे मृत तरुणाचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, की पिंपोडे बुद्रुक गावाच्या उत्तरेला दोन किलोमीटर अंतरावर परगणा वस्ती आहे. वस्तीच्या अलीकडे नव्याने बांधलेल्या श्रीघुमाई देवी मंदिरापासून हाकेच्या अंतरावर मळा नावाच्या शिवारात भगवान सपकाळ कालपासून ज्वारीची काढणी करत होता. आज सकाळी नऊच्या सुमारास तो एकटाच ज्वारी काढण्यासाठी गेला होता. दरम्यान, दुपारी बारा वाजता त्याची आई जेवणाचा डबा घेऊन गेली. यावेळी तिने शेतात भगवानचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहिला.
आपल्या पोटच्या पोराला रक्ताच्या थारोळ्यात पाहताच आईने आक्रोश केला. त्यावेळी परिसरात काम करणारे लोक धावून आले. घटनेची माहिती मिळताच वाठारचे सहायक पोलिस निरीक्षक अशोकराव हुलगे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर साताऱ्याहून ठसेतज्ज्ञ आणि श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. पोलिसांनी श्वानाला शेतात पडलेल्या खलबत्त्याच्या ठोंब्याचा वास देऊन मारेकऱ्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, श्वान परगणा वस्तीपर्यंत जाऊन घुटमळले. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक अशोकराव हुलगे अधिक तपास करत आहेत. या घटनेची फिर्याद लक्ष्मी सपकाळ यांनी दिली आहे. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे उपविभागीय अधिकारी एम.डी. शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली.
मजुरी करणाऱ्या कुटुंबावर आघातभगवान हा गरीब कुटुंबातील मुलगा होता. त्याचे वडील मच्छिंद्र आणि आई शेती व मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. भगवान व त्याचा लहान भाऊ अभिजित हा शेतीकामात त्यांना मदत करत. भगवानने गावातील खासगी दवाखान्यात मदतनीस म्हणून काम केले होते. या घटनेमुळे या माेलमजुरी करणाऱ्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. सायंकाळी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून रात्री शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.