भुर्इंज : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर वाई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाचवड, ता. वाई येथील उपबाजार आवारात बोकडांच्या खरेदी-विक्रीने उच्चांकी आकडा पार केला. तब्बल २२ हजार रुपयांना एका देखण्या बोकडाची विक्री झाली आहे. एकूण उलाढाल ४ ते ५ लाख रुपये एवढी झाली आहे. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र व दक्षिण महाराष्ट्रात प्रसिद्ध असणाऱ्या पाचवडच्या मंगळवारच्या जनावरांच्या बाजारात बोकड खरेदीसाठी थेट कोकणातील महाड, पोलादपूरसह, पुणे, सातारा व इतर ठिकाणाहून लोक आले होते. पाचवडचा मंगळवारी भरणारा जनावरांचा बाजार सर्वदूर प्रसिद्ध आहे. मात्र गोहत्या व गोवंशबंदीमुळे या बाजाराला गेल्या काही दिवसात अवकळा प्राप्त झाली आहे. या कायद्यामुळे या बाजाराची उलाढाल मोठ्या प्रमाणावर मंदावली आहे. अशा परिस्थितीत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी झालेल्या जनावरांच्या बाजारात बोकडांच्या खरेदी-विक्रीची उलाढाल नेहमीपेक्षा तब्बल ५ पट जादा झाली. एका बोकडाला उच्चांकी असा २२ हजारांची किंमत मिळाली असली तरी २ हजारांपासून १० हजारांपर्यंतचे बोकड येथे विक्रीसाठी उपलब्ध होते. तसेच सध्या बाजारात मटणाचे दर ४०० रुपये किलो असा आहे. मात्र येथील जनावरांच्या बाजारात जिवंत बोकडाची विक्री होताना सरासरी ४५० ते ५०० रुपये किलोने झाली. त्यातही देखण्या बोकडांना अधिक दर मिळाला. (वार्ताहर) विक्रेत्यांमध्ये आनंदीआनंद...दरवेळी आठवडा बाजारात बकरी, बोकडांच्या व्यवहाराची उलाढाल ५० हजार ते १ लाख रुपये एवढी होते. मात्र, यावेळी बकरी ईदमुळे ती ४ ते ५ लाख रुपये झाली आहे. विशेष म्हणजे आजच्या व्यवहारात डोक्यावर चांद असणारा एकही बोकड नव्हता. तरीही बोकडांना चांगला दर मिळाल्याने विक्रेते चांगलेच खूश आहेत. सर्व विक्रेते हे स्थानिक होते. तर खरेदीदार दूरहून आले होते, अशी माहिती समितीचे पर्यवेक्षक पी. एन. शिंंदे, लिपिक एम. एस. खाडे यांनी दिली.
बोकड तब्बल २२ हजारांना !
By admin | Published: September 23, 2015 10:15 PM