सातारा : सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या लोकांची घरे अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे पडली आहेत, त्यांना शासनाच्यावतीने पक्की घरे बांधून देण्यात यावीत, अशी मागणी इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत केली.कोकाटे म्हणाले, या तीन जिल्ह्यांत अतिवृष्टी व पूरामुळे माणसे, जनावरे, घरे, शेती व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पूरग्रस्त भागातील अनेक घरे पडलेली आहेत. ज्या घरात पाणी गेले आहे, ती घरे जीवितास धोकादायक आहेत, त्यामुळे शासनाने पूरग्रस्तांना पक्की घरे बांधून द्यावीत, ग्रामीण अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून असते, या शेतीचेच मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
सोयाबीन पीक नष्ट झाले आहे. जमिनीची मशागत करण्यासाठी मोठा खर्च येणार आहे. शासनाने सरसकट शेतकरी व शेतमजूर यांना नुकसान भरपाई द्यावी. पशुधन ही ग्रामीण भागातील समांतर अर्थव्यवस्था आहे. अनेक जनावरे दगावली आहेत, वाचलेल्या जनावारांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. त्यामुळे दुग्ध व्यावसायिक पशुपालक मोठ्या संकटात सापडले आहेत. पूरग्रस्त विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके, वह्या, स्कूल बॅग, गणवेश मोफत द्यावेत.हा पूर मानवनिर्मित असल्याचा आरोप करुन कोकाटे पुढे म्हणाले, कर्नाटक सरकार बनाव करत आहे. अलमट्टी धरण हे १२३ टीएमसीचे नसून २२३ टीएमसीचे आहे. कृष्णेचे अतिरिक्त पाणी कऱ्हाड येथून उचलून सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबादमधील दुष्काळी गावांना देण्यासाठी शासनाने कर्नाटक सरकारशी समन्वय साधून निर्णय घ्यावा.यावेळी निसार मुल्ला, अमोल संकपाळ, राहुल बर्गे, प्रशांत यादव, प्रमोद काटे, सुनील भोसले, सूर्यकांत चव्हाण, सत्यजित सानप, राजन सूर्यवंशी, ज्योतिराम यांची उपस्थिती होती.