मलकापूर : बिल्डरच्या कार्यालयाच्या शटरचे कुलूप उचकटून चोरट्यांनी सुमारे सहा लाखांची रोकड लंपास केली. येथील शास्त्रीनगर पश्चिममधील ‘पांडुरंग भवन’ इमारतीत घडलेली ही घटना रविवारी सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आली.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आगाशिवनगर येथील आर्यस्पर्श इमारतीत वास्तव्यास असलेले दत्तात्रय हणमंतराव देसाई (मूळ रा. वाठार, ता. कºहाड) हे बांधकाम व्यावसायिक आहेत. शास्त्रीनगर येथील ‘पांडुरंग भवन’ या इमारतीत ‘डी. एस. देसाई असोसिएट कन्स्ट्रक्शन’ नावाचे त्यांचे कार्यालय आहे. रविवार हा बांधकाम व्यवसायातील मजुरीसह इतर देणी देण्याचा दिवस असतो. म्हणून दत्तात्रय देसाई यांनी शनिवारीच वाळू विक्रीतून व इतर व्यवहारातून काही रक्कम जमा केली होती. ती रोकड मजुरांची दैनंदिन कामाची मजुरी, बिल्डिंगचे साहित्य खरेदी केलेले पैसे देण्यासाठी तसेच इतर देणी भागविण्यासाठी रविवारी वापरली जाणार होती. कार्यालयातील कॅशिअर प्रमोद गुरव व अंकुश थोरात यांनी ५ लाख ९० हजार एवढी रक्कम कार्यालयात ड्रॉव्हरमध्ये आणून ठेवली होती. शनिवारी रात्री सात वाजता दत्तात्रय देसाई यांना माहिती देऊन कार्यालय बंद करा, असे सांगून सर्व कर्मचारी घरी गेले. कार्यालयातील काम आटोपून दत्तात्रय देसाई हे रात्री दहा वाजता आगाशिवनगर येथील घरी गेले. त्यानंतर रात्रीच्यावेळी चोरट्यांनी कार्यालयाच्या शटरचे कुलूप उचकटून ड्रॉव्हरमधील ५ लाख ९० हजार रुपये लंपास केले.रविवारी सकाळी आठच्या सुमारास कर्मचारी कार्यालय उघडण्यास आले असता शटरचे कुलूप तुटलेले दिसले. त्यामुळे त्यांनी याबाबतची माहिती दत्तात्रय देसाई यांना दिली. देसाई यांनी कार्यालयात येऊन पाहिले असता रोकड चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत देसाई यांनी कºहाड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.कार्यालयातील सीसीटीव्ही बंदशनिवारी रात्री चोरी झालेल्या बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत. मात्र, गत काही दिवसांपासून ती यंत्रणा बंद आहे. जर ही यंत्रणा सुरू असती तर चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असते.ठसेतज्ज्ञ घटनास्थळीघटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तसेच पोलिसांनी चोरीच्या तपासासाठी तातडीने ठसेतज्ज्ञ व श्वान पथकास घटनास्थळी पाचारण केले. श्वानाने घटनास्थळापासून उपमार्गापर्यंत माग काढून श्वान तेथेच घुटमळले.फायनान्समध्ये चोरीचा प्रयत्न‘पांडुरंग भवन’ या इमारतीत शेजारीच ‘इंडशियन मार्केटिंग फायनान्स सर्व्हिसेस’चे कार्यालय आहे. या कार्यालयाचे शटर उचकटल्याचे रविवारी सकाळी निदर्शनास आले. शाखाप्रमुख दत्ताजी पाटील यांनी पोलिसांसमक्ष खातरजमा केली असता बँकेतील कोणतेही साहित्य चोरीस गेले नसल्याचे दिसून आले.
मलकापुरात बिल्डरचे कार्यालय फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2018 11:06 PM