कोपर्डे हवेली : कऱ्हाड ते मसूर या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असते. सध्या कारखाने सुरू आहेत. या मार्गावरून ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाड्यांची संख्या जास्त असून, एकापाठोपाठ अनेक बैलगाड्या जात असल्यामुळे इतर वाहनांना अडथळा निर्माण होत आहे. तसेच वाहतुकीचा वेग मंदावल्याने कोंडी निर्माण होत आहे.
हातगाड्यांना दंड
कऱ्हाड : प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली असूनही शहरात प्लॅस्टिक पिशव्यांचा चोरीछुपे वापर केला जात आहे. दोन दिवसांपूर्वी पालिकेने प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या दोन हातगाडे चालकांवर कारवाई करून प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड वसूल केला होता. ही मोहीम अधिक तीव्र करणे गरजेचे आहे.
उपमार्गावर पार्किंग (फोटो : २८इन्फोबॉक्स०२)
कऱ्हाड : मलकापूरमध्ये सेवा रस्त्यावर मनमानीपणे मालट्रक तसेच दुरुस्तीस आलेली वाहने पार्क केली जात आहेत. त्यामुळे सेवा रस्ता पार्किंग झोन बनल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. उपमार्गावर वाहने पार्क करणाऱ्यांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई करण्याची मागणी प्रवाशांतून केली जात आहे.
वेलींचा विळखा
तांबवे : विजेच्या खांबासह काही ठिकाणी तारांवरही झाडवेली वाढल्या आहेत. त्यामुळे शॉर्टसर्किट होऊन एखाद्याला जीव गमवावा लागेल, अशी स्थिती आहे. अनेक ठिकाणी विजेच्या खांबावरील प्रवाहित तारेपर्यंत या वेल गेल्या आहेत. त्याचा धक्का बसून एखाद्याचा जीव जाण्याचा धोकाही त्यामुळे निर्माण झाला आहे. वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे या वेली मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.