सातारा : पोवई नाक्यावरील एका सराफाच्या दुकानात बुरखा घालून आलेल्या दोन महिलांनी सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पावणेदोन लाख रुपयांच्या सोन्याचा मुद्देमाल लंपास केला. हा चोरीचा प्रकार दुकानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे.याबाबत माहिती अशी की, पोवई नाक्यावरील चंदुकाका सराफ अँड सन्स या दुकानामध्ये सोमवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास दोन बुरखा घातलेल्या महिल्या आल्या. त्यांनी सोने विभागातील सेल्समन सपकाळ याला बाटल्या (बांगडी) पाहायला मागितल्या. त्याप्रमाणे सेल्समनने विविध डिझाईन्सच्या पाटल्या दाखवल्या.
त्यावेळी दोघी महिलांनी सेल्समनची नजर चुकवून त्यापैकी कोयरी नक्षीकाम असलेल्या दोन सोन्याच्या पाटल्या चोरल्या. त्या दोघी दुकानातून बाहेर पडल्यानंतर दोन पाटल्या कमी असल्याचे सेल्समनच्या लक्षात आले. त्याने तातडीने सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता दोघी महिलांनी त्या चोरल्याचे निदर्शनास आले.
त्यानंतर तातडीने सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, दोन्ही महिलांचा शोध सुरू आहे.