सध्याचं युग हे सोशल मीडियाचं युग आहे आणि मुलंदेखील त्यापासून दूर नाहीत. सोशल मीडियाचं जग जितकं मन रिफ्रेश करणारं आहे तितकंच ते चिंता वाढवणारं आहे. लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षभरापासून मुलं घरातूनच अभ्यास करत आहेत. फोन, टॅब्लेट, आयपॅड किंवा संगणक अशा वस्तू मुलं सहजरित्या हाताळू लागली आहेत. याचे अनेक चांगले-वाईट परिणामही आता समोर येऊ लागल्याने पालकांची मुलांच्याबाबतीत जबाबदारी अधिक वाढली आहे.
शाळा बंद होतील आणि घरातूनच अभ्यास करावा लागेल, याची कल्पनाही कुणी केली नव्हती. मात्र, कोरोना विषाणूमुळे आज शिक्षणाचं स्वरूपच बदलून गेलं आहे. शाळा बंद ठेवून विद्यार्थ्यांना घरातून ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागत आहे. ऑनलाईन शिक्षणाचे फायदे जितके आहेत, तितकेच तोटेदेखील आहेत. त्यामुळे हातामध्ये मोबाईल, टॅब, लॅपटॉप घेऊन आपला पाल्य अभ्यास करतोय किंवा नाही, हे सातत्याने पाहण्याची जबाबदारी पालकांवर येऊन पडली आहे. पालकांना मुलांचा अभ्यास करून घ्यावा लागत आहे.
अनेक पालक मोठी चूक करु लागले आहेत. ते आपल्या मुलाला अभ्यास करण्यासाठी आमिष दाखवतात. जर तू अभ्यास केलास तर तुला हे देईन, अभ्यास केलास तर ते देईन. अशाने मुलं स्वत:साठी अभ्यास न करता, ते आमिष मिळवण्यासाठी अभ्यास करु लागली आहेत. अशी चूक पालकांनी कधीही करू नये. अशा चुकांमुळे मुलांचा अभ्यासातला रस हळूहळू निघून जात आहे. या सर्वांवर उपाय म्हणून पालकांनाच आता आपल्या मुलांच्या अभ्यासक्रमाचे वेळापत्रक तयार करायला हवे. अभ्यास आणि खेळाला समसमान महत्त्व द्यायला हवे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपली मुलं आज फोन, टॅब्लेट, आयपॅड किंवा संगणक अशी साधने वापरत असल्याचा पालक अभिमान बाळगत आहेत. मात्र, हे तंत्रज्ञान अतिशय हानिकारक आहे. पालक घरी नसताना वा असतानाही मुलं काय पाहतात, याकडे आपले लक्ष आहे का, याचाही गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.
(चौकट)
पालकांनी हे करावं
- मुलावर नेहमी आपलं बोलणं थोपवू नये. त्याचं म्हणणंसुद्धा ऐकावं.
- कधीकधी खरंच त्याला अभ्यास करायचा नसेल, त्याचं मन लागत नसेल तर अशावेळी मारून मुटकून आणि धमकावून त्याला अभ्यासाला बसवण्यात काहीच अर्थ नाही.
- कारण अभ्यास तो असतो जो मूल मन लावून करते. पण तुम्ही जबरदस्तीने अभ्यासाला बसवल्याने तो जो काही अभ्यास करेल तो त्याच्या लक्षातच राहणार नाही.
- त्यामुळे त्याला कधी कंटाळा आला तर काहीवेळ त्याला त्याच्या आवडीची गोष्ट करू द्या आणि मग पुन्हा अभ्यासाला बसायला सांगा.