शिरवळ : खंडाळा तालुक्यातील भादे याठिकाणी राहत्या घरातील खिडकीतून दरवाजा उघडत आत प्रवेश करीत अज्ञात चोरट्यांनी घरामधील सोन्याचे दागिने, दुचाकीसह रोख रक्कम असा ६८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. यामुळे भादे परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबतची शिरवळ पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, भादे (ता. खंडाळा) याठिकाणी शामराव विठ्ठल पवार हे कुटुंबीयांसहित राहण्यास आहेत. दरम्यान, मंगळवार दि. ८ जून रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घराच्या खिडकीतून दरवाजा उघडत घरामध्ये प्रवेश करून प्लास्टिकच्या डब्यातील १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण, १२ हजार रुपये किमतीचे ६ ग्रॅम वजनाची दोन कर्णफुले, ३ हजार रुपये किमतीचा मोबाईल, २० हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच-११-बीडब्ल्यू-९५७३), रोख रक्कम ३ हजार ५०० रुपये असा ६८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या घटनेची फिर्याद शामराव पवार यांनी शिरवळ पोलीस स्टेशनला दिली असून, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे करीत आहेत.