सातारा: वाई येथील सिद्धनाथवााडी येथे शनिवारी पहाटे पाच ठिकाणी घरफोड्या झाल्या. एका घरातील सुमारे तीन लाखांचा ऐवज लंपास केला. अन्य घरातील साहित्यांची नासधूस चोरट्यांनी केली. एकाच रात्रीत पाच घरफोड्या झाल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सिद्धनाथवाडी येथील आशा चिकणे या महाबळेश्वरला आपल्या नातेवाइकांकडे गेल्या होत्या. त्यांच्या घराला कुलूप होते. शनिवारी पहाटे चोरट्यांनी कुलूप कटावणीच्या साह्याने तोडून चोरी केली. ही बाब निदर्शनास आल्यानंतर याबाबतची माहिती शेजारी राहणारे रामचंद्र जंगम यांनी अशा चिकणे यांना फोनवरून दिली.
घर बांधणीसाठी ठेवलेले १ लाख ५० हजार रोख व ३ तोळ्यांचे सोन्याचे दागिने असा सुमारे २ लाख ९० हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. तसेच त्याच परिसरातील अनिकेत राजाराम कदम, आनंदा गाडे, धीरज राठोड, राजेंद्र जायगुडे यांचीही घरे व हॉटेल देवगिरीचा दरवाजाचे कुलूप कटावणीच्या साह्याने तोडून घरे फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु चोरट्यांना रोख रक्कम किंवा मुद्देमाल न मिळाल्याने त्यांनी घरातील साहित्याची नासधूस केली.
युगल घाडगे यांच्या हॉटेल देवगिरीमध्ये चोरट्यांनी सामानाचे दहा हजारांचे नुकसान केले आहे. तसेच नगरसेविका रेश्मा प्रदीप जायगुडे यांच्या घरापाठीमागील दोन घरे अशाच पद्धतीने फोडण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. मात्र, श्वान घराशेजारीच घुटमळले, त्यामुळे चोरटे त्याच परिसरातील असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या घटनेची वाई पोलीस ठाण्यात नोंद झाली असून, याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मोतेकर हे करत आहेत.