सातारा: शहरालगत असणाऱ्या गोरखपूर, पीरवाडी येथून ४७ हजारांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सपना संदीप कणसे (वय ४५, रा. गजानन विश्व, गोरखपूर, पीरवाडी, सातारा) यांचा टुरिझम व्यवसाय आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शुक्रवार, दि. १६ रोजी दुपारी पावणेएक ते पावणेदोन या वेळेत त्यांच्या राहत्या घराच्या बंद दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून चोरट्याने आत प्रवेश केला आणि लाकडी कपाटाच्या ड्राॅवरचे लॉक तोडून त्यातील ३० हजार रुपये किमतीचे दीड तोळे वजनाचे सोन्याचे मिनी गंठण, दोन हजार रुपयांचे चांदीचे पैंजणाचे दोन जोड, १५ हजार रुपयांचे मनगटी घड्याळ असा ४७ हजार ९०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी सपना कणसे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक वाघ करत आहेत.