मंद्रुळकोळे खुर्द-काटकरवाडी येथील शिवाजी काटकर, यशवंत काटकर व महिपती काटकर यांच्या गवताच्या गंजी शेजारी शेजारी होत्या. अचानक गवताच्या गंजीला आग लागली. प्रचंड ऊन आणि वारा यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. त्यामुळे ही आग शेजारच्या गंजीकडे गेल्याने त्याचा मोठा भडका उडाला. ज्या गंजींना आग लागली त्याशेजारी राहती घरे व इतरांच्याही गवताच्या गंजी होत्या. गंजींना लागलेली आग निदर्शनास येताच ग्रामस्थांनी एकत्र येऊन पाण्याचे टँकर आणून आग विझविली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
घटनेची माहिती मिळताच मंडलाधिकारी प्रवीण शिंदे यांच्या सूचनेनुसार तलाठी संजय काशिद यांनी घटनास्थळी भेट देऊन जळिताचा पंचनामा केला. आगीत शिवाजी काटकर यांचे १० हजार ८००, यशवंत काटकर यांचे २२ हजार ५०० व महिपती काटकर यांचे १३ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले.
चौकट
जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मिटला
घटनेची माहिती मिळाल्यानंतर काँग्रेसचे प्रांतिक प्रतिनिधी हिंदूराव पाटील यांनी त्याठिकाणी भेट दिली. त्यांनी जळीतग्रस्तांच्या जनावरांना चारा उपलब्ध करून दिला. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मिटला असून शासनाकडून जळीतग्रस्तांना मदत मिळवून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी अरविंद कुंभार, दादासाहेब साळुंखे, अशोकराव काटकर, जोतीराम काटकर, खाशाबा काटकर, श्रीमंत घोलप, विकास काटकर, अंकुश काटकर, बापूराव काटकर उपस्थित होते.
फोटो : ०३केआरडी०२
कॅप्शन : मंद्रुळकोळे खुर्द-काटकरवाडी, ता. पाटण येथे आगीत गवताच्या गंजी जळून खाक झाल्यानंतर काँग्रेसचे प्रांतिक प्रतिनिधी हिंदूराव पाटील यांच्यासह महसूल कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.