गुलाब पठाण ।किडगाव : खेळण्या-बागडण्याच्या वयातच दोन्ही हात चुलीच्या निखाऱ्यात पोळले अन् तिच्या नशिबी कायमचे अपंगत्व आले. दहाही बोटं जळली असली तरी पाटण तालुक्यातील कोकिसरे येथील अर्चना यमकर हिने जिद्द हारलेली नाही. दोन्ही मनगटांच्या मदतीने ती भविष्य घडवत आहे. ती सध्या मोरगिरी केंद्रात दहावीची परीक्षा देत आहे.
अर्चना नुकतीच रांगायला लागलेली होती. तिला लहान भावंडांच्या सोबत सोडून आईवडील मजुरीला गेले होते. त्यावेळी घरात कोणीही मोठी माणसं नव्हती. त्यावेळी अर्चना खेळत-खेळत चुलीजवळ गेली अन् रखरखीत विस्तवाचे निखारे असलेल्या चुलीत तिचे दोन्ही हात पडले. मनगटापर्यंत दोन्हीही हाताची तळवे व दहाही बोट जळून खाक झाली. वडिलांनी बिकट परिस्थितीमुळे घरगुती उपाय सुरू केले. दोन्ही हातांची बोटं खाक झाल्यामुळे तिला दैनंदिन कामं करतानाही अडचणी येत होत्या. त्यामुळे पालकही चिंतेत होते. पण जसजसी अर्चना मोठी होत होती. ती जिद्दीनं उभं राहत होती.
अर्चना सिदू यमकर ही सध्या मोरणा विद्यालय, मोरगिरी या शाळेत दहावीत शिकत आहे. डोंगरकपारीतून पाऊल वाटेने गवळीनगर ते मोरगिरी चालत जाऊन दहावीचे पेपर देत आहे. नियतीवर मात करत दोन्ही मनगटांत पेन धरून दहावीचे पेपर देत आहे. सहा महिन्यांपूर्वी अर्चनाच्या वडिलांचे निधन झाले. तरीसुद्धा न डगमगता ती जिद्दीने शिकत आहे.
अर्चनाची लहान बहीण सुनीता ही नववीत शिकत आहे. सुनीता अर्चनाची सर्व कामे करते. तिचे कपडे, वेणी, जेवण, सडा टाकणे व अन्य कामेही लहान बहीण सुनीताच्या मदतीने अर्चना करत असल्याने व मनात शिकण्याची जिद्द व आत्मविश्वास असल्याने अर्चना इथंपर्यंत पोहोचली आहे. वेणी जेवण सडा टाकणे व अन्य कामे सुद्धा लहान बहीण सुनिताच्या मदतीने अर्चना करत असल्याने अर्चनाच्या मनात शिकण्याची जिद्द व आत्मविश्वास असल्याने अर्चना आज इथपर्यंत पोहचली आहे. अर्चना हुषार तर आहेच पण तीचे हस्ताक्षर सुद्धा सुंदर आहे. अर्चना ही परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रावर येते तेव्हा तिला पाहण्यासाठी विद्यार्थी गर्दी करत असतात. तिला बोर्डाकडून सहायकाची सवलत दिली जाते. ती तिने नाकारली. तसेच वीस मिनिटांचा जादा वेळ मिळत असूनही तिला या सुविधेचा आवश्यकता नाही. यावरुन तिने आपण इतर विद्यार्थ्यांपैकीच एक असल्याचे दाखवून दिले आहे. तिच्या जिद्दीचे परिसरातील पालकांनाही कौतूक वाटत आहे. विद्यालयातील अनेक उपक्रम व कार्यक्रमात तीचा सहभाग असतो. घरची गरीबी व अठरा विश्व दारिर्द्य असतानाही अर्चनाची ही जिद्द वाखाणण्याजोगी आहे.सहायक नाकारलादहावीच्या बोर्डाकडून तिला सहायक घेण्याची सुविधा आहे. पण अर्चनाने ती सुविधा नाकारत स्वत: पेपर सोडविण्याचा हट्ट धरला. अन् ती परीक्षा देत आहे. अस्थिव्यंग असल्याने अर्चनास वीस मिनिटे जादा वेळ दिला आहे. पण इतर विद्यार्थ्यांच्या बरोबरीने ती पेपर सोडवत आहे. मोरणा विद्यालयातील शिक्षकांनी आजपर्यंत तिला सर्वकाही मदत केलीय; पण तिला गरज आहे ती हातांची.