दुरुस्तीची मागणी
सातारा : सातारा शहरातील ऐतिहासिक ठिकाण असलेल्या चारभिंती परिसरातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे. पूर्वी राजघराण्यातील स्त्रियांना शहरातील मिरवणुका, कार्यक्रम पाहण्यासाठी चारभिंतीची
उभारणी करण्यात आली होती. या वास्तूला इतिहास असल्याने चारभिंती परिसराला विशेष महत्त्व आहे.
कार्यशाळा उत्साहात
सातारा : केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या पंडित मदनमोहन मालवीय राष्ट्रीय केंद्रांतर्गत प्रशासकीय सेवकांसाठी धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयांमध्ये आयोजित ऑनलाइन कार्यशाळा उत्साहात पार पडली.
इंटरनेट सेवा ठप्प
नागठाणे : नागठाणे, ता. सातारा येथील पोस्ट ऑफिसमधील इंटरनेट सेवेचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. या पोस्ट कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात पाडळी, अतीत, बोरगाव, भरतगाव, वेचले काशील, निसराळे आदी गावे येतात.
कोरोनाविषयक गावोगावी गप्पांचे फड
सातारा : कोरोनाचा कहर ओसरल्याने लॉकडाऊन काळात ओस पडलेल्या गावोगावच्या पारावर पुन्हा गप्पांचे फड रंगू लागले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातही लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केली होती. गावात कोरोना रुग्ण संख्या वाढल्यास ग्रामस्थ स्वयंस्फूर्तीने गावातील सर्व व्यवहार बंद ठेवत होते. तरी सध्या पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. तरी नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे बनले आहे.
शिबिर उत्साहात
शिरवळ : शिरवळ येथील क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून मोफत आरोग्य शिबिर कर्णवाडी येथे पार पडले. यावेळी शेतीपूरक जोडधंदा म्हणून शेळीपालन, कुक्कुटपालन व दुग्धव्यवसाय करण्याला प्रोत्साहान मिळाले.
मध्यमवर्गीयांना भुर्दंड
सातारा : केंद्र सरकारने सर्वच टोल नाक्यांवर फास्टॅग सक्ती केली आहे. सर्वच चारचाकी वाहनांना फास्टॅग सक्ती केल्याने मध्यमवर्गीयांना याचा मोठा आर्थिक फटका बसणार आहे. जिल्ह्यातील सुमारे दोन लाख वाहनांना फास्टॅगचा फटका बसणार आहे.
भिलारचा यात्रोत्सव रद्द
पाचगणी : पुस्तकाचे गाव म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या भिलार, ता. महाबळेश्वर येथील जत्री-कुंभळजाई देवीचा वार्षिक यात्रोत्सव यावर्षी २१ व २२ फेब्रुवारी रोजी येत असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा उत्सव रद्द करण्यात आला आहे. फक्त धार्मिक कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती यात्रा कमिटींनी दिली.