भुर्इंज : येथील बसस्थानक आता पूर्णपणे काळाच्या ओघात लुप्त होण्याच्या दिशेने वाटचाल करत असून या बसस्थानकाचा वाहतूक नियंत्रण कक्ष महामार्ग विस्तारीकरणात गेला असून चक्क उपहारगृहात सध्या वाहतूक नियंत्रण कक्ष सुरु आहे. येणा-जाणाऱ्या बसेसवर आता उपहारगृहातूनच नियंत्रण ठेवले जात असल्याचे पाहायला मिळत आहे. भुर्इंज हे गाव राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वर आहे. या गावावर या गावाच्या वाड्या वस्त्यांसह पूर्व भागातील सर्व गावे अवलंबून आहेत. एकेकाळी भुर्इंजचे वैभव असणारे भुर्इंजचे बसस्थानक सध्या बेवारस स्थितीत आहे. महामार्ग विस्तारीकरणात या बसस्थानकाचा मोठा भाग गेला आहे. त्यामध्ये या बसस्थानकाचा वाहतूक नियंत्रण कक्ष काढण्यात आला आहे. सध्या हा वाहतूक नियंत्रण कक्ष याच बसस्थानकातील उपहारगृहात सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून हे उपहारगृह बंद असून येथे गाडी उभी करण्यासाठी बसचालक व वाहक पैशाची मागणी करत असल्याने उपहारगृह बंद केल्याचे संबंधितांकडून सांगितले जात आहे. बसस्थानक परिसरात वाहतुकीची कोंडी होत आहे. स्थानिक पातळीवर ये-जा करणाऱ्या बसेस सोडल्या तर लांब पल्ल्याची एकही बस या बसस्थानकात येत नाही. स्थानिक पातळीवर वाहतूक मोठ्या प्रमाणावर असल्याने येथे वाहतूक नियंत्रण कक्ष आजही कार्यान्वित आहे. मात्र हाच वाहतूक नियंत्रण कक्ष महामार्ग विस्तारीकरणात पाडला गेला असल्याने येथे उपहारगृहात वाहतूक कक्ष हलवण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
बसस्थानकाचे नियंत्रण उपहारगृहातून!
By admin | Published: December 26, 2015 11:53 PM