आदर्की : फलटण-वाठार स्टेशन मार्गावर वीस-पंचवीस गावे आहेत. कोरोना संसर्गामुळे गावातील सर्व व्यवसाय बंद आहेत; पण गावच्या फाट्यावरील व्यवसाय मात्र तेजीत सुरू असल्याने रस्त्यावरील फाटे अवैध धंद्यांचे साठे ठरत असल्याचे चित्र दिसत आहे.
फलटण पश्चिम भागात आदर्की, वाठार स्टेशन, काळज, सासवड, लोणंद, बिबी, ताथवडा, खडकी, मलवडी, वाघोशी अशी अनेक गावे आहेत. या गावातील व बाहेरील व्यावसायिकांनी गावाबाहेर मुख्य रस्त्यावर जागा घेऊन ढाबे, हॉटेल, डेअरी, हॉर्डवेअर, सलून, वडापाव, भाजीपाला, फळे असे व्यवसाय सुरू केले होते; परंतु कोरोना संसर्ग राेखण्यासाठी जिल्ह्याधिकाऱ्यांनी संचारबंदी लागू करतानाच सर्व अत्यावश्यक सेवा बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे गावातील सर्व व्यवसाय सध्या बंद आहेत. परंतु गावाच्या बाहेर फाट्यावर वेगळेच चित्र नजरेस पडत आहे.
मुख्य रस्त्यावरील फाट्यांवर अनेक व्यवसाय राजरोसपणे सुरू आहेत. सामाजिक अंतर, सॅनिटायझर, आदी नियमावलीला तिलांजली देऊन रात्रं-दिवस हे व्यवसाय सुरू ठेवले जातात. ही बाब निदर्शनास येऊनही प्रशासन गांधारीची भूमिका घेत आहे. फाट्यांवर सुरू असलेली दुकाने कोरोनाचे हॉटस्पॉट ठरण्यापूर्वी प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घ्यावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.