लोकमत न्यूज नेटवर्क
फलटण : फलटण शहर आणि तालुक्यात अवैध खासगी सावकारीचा व्यवसाय जोमात सुरू असताना आता खासगी फायनान्स कंपन्यांनी जबरदस्तीने कर्जवसुली सुरू केली आहे. या दुहेरी संकटात अनेकजण अडकले असून, खासगी सावकार आणि फायनान्सवाले जोमात, तर कर्जदार कोमात अशी अवस्था तालुक्यात निर्माण झाली आहे.
अवैध सावकारीचा कायमचा बिमोड करण्यासाठी राज्य शासनाने जुन्या सावकारी कायद्यात बदल करून नवीन कायदा मंजूर केला. मात्र धनदांडगे, राजकीय वरदहस्त व गुंडगिरीच्या जोरावर व्याजाने पैसे देऊन काहींना वेठीस धरत आहेत. फलटण पंचक्रोशीत वाढत्या औद्योगिकीकरणाने येथील जमिनीला सोन्याचा भाव आला आहे. जमिनीतून कोट्यवधी रुपये आल्याने अनेकांनी छुप्प्या पद्धतीने सावकारी सुरू करून, परप्रांतीयांसह राज्याच्या इतर जिल्ह्यांतील अनेक लोकांना काही ठराविक रकमा देऊन, व्याजाचा धंदा सुरू केला आहे.
गरीब व गरजू लोकांच्या अडचणींचा फायदा उठवत अनेक खासगी सावकार ३ ते १० टक्के व्याजाने पैसे देत असल्याचा छुपा धंदा मोठ्या प्रमाणावर तालुक्यात सुरू आहे. काहीजण तर चक्क २० ते ४० टक्के व्याजानेही पैसे देत आहेत, हे व्याजाचे दर डोळे पांढरे करणारे आहेत; परंतु, पर्याय नसल्यामुळे अनेक जण सावकारीचा धंदा करणाऱ्यांकडून पैसे घेत आहेत. अवैध सावकारांकडून घेतलेल्या रकमेच्या व्याजाचे आकडे दिवसेंदिवस फुगत जातात, मग हे पैसे सावकाराला परत करणे कठीण होते. फलटण परिसरातून अनेक जण खासगी सावकाराकडून अव्वाच्या सव्वा व्याजदराने घेतलेले पैसे परत करू न शकल्याने कुटुंबासह फरार झाले, तर अनेक जण कुटुंबाला वाºयावर सोडून परागंदा झाल्याच्या घटना ताज्या आहेत.
सावकारी पाठोपाठ शहरात खासगी फायनान्स कंपन्यांचीदेखील मनमानी सुरू आहे. पैसे व व्याजाची रक्कम आकारण्यासाठी संबंधित कंपन्यांच्या प्रतिनिधींनी जबरदस्तीने वसुली सुरू केली असून, कर्जदार मेटाकुटीला आले आहेत. फायनान्स कंपन्यांकडून जास्त पैसे उकळण्यासाठी घर खाली करायला लावणे, दुचाकी, चारचाकी वाहने ताब्यात घेणे, जमीन लिहून घेणे अशा घटना घडत आहेत. एकंदरीतच सावकार व फायनान्स कंपन्या जोमात आणि कर्जदार कोमात अशी काहीशी स्थिती फलटण परिसरात आहे.
(चौकट)
.. म्हणे अर्थपूर्ण संबंध
अवैध सावकारीतून लाखो रुपयांची माया गोळा करीत आहेत. अशा लोकांच्या पोलिसांबरोबर असलेल्या अर्थपूर्ण संबंधामुळे तक्रार देण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. त्यामुळे अवैध सावकारी छुप्या पद्धतीने फलटण परिसरात जोरात सुरू असल्याची चर्चा नागरिक करीत आहेत.
(कोट)
फलटण शहर आणि तालुक्यात खासगी सावकारी फोफावू लागली आहे. त्याला प्रशासनाने आळा घालावा. खाजगी फायनान्सवालेही मोबाइल किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्यांनी हप्त्यावर घेतलेत त्यांनाही त्रास देऊ लागले आहेत, अशांचा पोलिसांनी तातडीने बंदोबस्त करावा.
- आमिरभाई शेख, सामाजिक कार्यकर्ते