कऱ्हाड : कऱ्हाड तालुका खरेदी-विक्री संघाची वाटचाल ही नेहमीच दिवंगत विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या विचारानेच होईल. त्यांचे विचार पुढे घेऊन जाणे हे आपले सर्वांचे काम आहे, असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष रंगराव थोरात यांनी केले.
कऱ्हाड तालुका खरेदी-विक्री संघाची ८३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत झाली. यावेळी रंगराव थोरात बोलत होते. या सभेला कोयना दूध संघाचे अध्यक्ष वसंतराव जगदाळे, कोयना बँकेचे अध्यक्ष रोहित पाटील, रयत कारखान्याचे माजी उपाध्यक्ष पी. जी. पाटील, प्रा. धनाजी काटकर, सीए तानाजीराव जाधव, सीए के. एल. सावंत, अनिल मोहिते, हणमंतराव चव्हाण, महेश जाधव, प्रकाश पवार व सर्व संचालक उपस्थित होते.
रंगराव थोरात म्हणाले, ‘कऱ्हाड तालुका खरेदी-विक्री संघाची स्थापना १९३७ साली झाली असून, संघ शताब्दी वर्षाकडे वाटचाल करत आहे. संस्थेने सन २०२०-२०२१मध्ये ८८ कोटी ५८ लाखांची उलाढाल केली असून, संस्थेने २ कोटी ६६ लाख एवढा व्यापारी नफा मिळवला आहे. संस्थेच्या २६ शाखा विभागांमार्फत शेतकऱ्यांना शेतीउपयुक्त मालाचा योग्य दरात पुरवठा केला जातो. संस्थेच्या स्वमालकीच्या ४ डिझेल व पेट्रोल पंपांच्या माध्यमातून ग्राहकांना स्वच्छ, निर्भेळ तेल पुरवठा केला जातो.’
संस्थेकडे नामवंत कंपनीच्या रासायनिक खतांच्या व पाईपच्या डिलरशिप आहेत. त्याचबरोबर संस्थेने कोयना दूध संघाच्या दुग्धजन्य पदार्थांची व इफको कंपनीच्या तणनाशक, कीटकनाशक औषधांची डिलरशिप घेऊन माफक दरात ग्राहकांना सेवा पुरवली जात आहे.
सन २०२०-२०२१मध्ये संस्था सभासदांना १५ टक्के लाभांश दिलेला आहे तसेच कोरोनाच्या काळामध्ये संस्थेचे पूर्ण व्यवहार चालू ठेऊन ग्राहकांना सेवा पुरविल्याबद्दल संस्थेच्या सेवकांना भरघोस बोनस दिलेला आहे. भविष्यामध्ये सेवकांना पगारवाढ करण्याचा विचारही त्यांनी व्यक्त केला.
या सभेचे नोटीस वाचन सरव्यवस्थापक शशिकांत पाटील यांनी केले. राजेंद्र जाधव यांनी सूत्रसंचालन केले तर बाजीराव मोहिते यांनी आभार मानले.
फोटो :
कऱ्हाड येथे खरेदी-विक्री संघाच्या वार्षिक सभेत अध्यक्ष रंगराव थोरात यांनी मार्गदर्शन केले.