नितीन काळेल, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा : जिल्ह्यातील शेतकरी आले खरेदीच्या प्रश्नावर आक्रमक झाले असून सातारा बाजार समितीतही शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या बैठकीत प्रतवारी न करता जुने आणि नवे आले सरसकट खरेदीचा ठराव झाला होता. यानंतर आता याची जिल्हा उपनिबंधकांनी दखल घेतली असून याबाबत सर्व बाजार समित्यांना सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे.
जिल्ह्यात नवीन आणि जुने आले याबाबत दर निश्चिती करताना व्यापाऱ्यांकडून मोठा फरक ठेवला जात होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिध्द केले होते. याची दखल घेऊन सातारा बाजार समितीने मागील रविवारी व्यापारी आणि शेतकऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला बाजार समितीचे सभापती विक्रम पवार, उपसभापती मधुकर पवार यांच्यासह संचालक, व्यापारी आणि आले उत्पादक शेतकरी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी सांगितल्या.
व्यापाऱ्यांकडून नवीन आणि जुन्या आल्याच्या दरात मोठी तफावत होते. त्यामुळे आर्थिक नुकसान होत असल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले. तसेच व्यापाऱ्यांनी आले खरेदीनंतर ३० टनापर्यंत गाडी भरेपर्यंत वाट न पाहता १२ टन भरताच इन्सुलेटेड व्हॅनने माल पाठवावा, तो खराब होणार नाही. याशिवाय शेतमालाचे पेमेंट वेळेत द्यावे, अशीही मागणीही शेतकऱ्यांनी केली होती. तर व्यापाऱ्यांनी सरसकट आले सद्यस्थितीतील बाजार भावाने खरेदी करण्याचे मान्य केले. त्याचबरोबर यावेळी शेतकऱ्यांनी कोणतीही प्रतवारी न करता सरसकट एकत्र करून आले बाजार समितीतील अधिकृत परवानाधारक व्यापाऱ्यांनाच विकावे. सरसकट आले खरेदीचा सौदा न केल्याची तक्रार बाजार समितीकडे आल्यास संबंधिताचा परवाना रद्द करुन फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असे ठराव करण्यात आले होते. या ठरावाची आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या निवेदनाची दखल उपनिबंधक मनोहर माळी यांनी घेतली आहे. तसेच बाजार समितींना सूचना केली आहे.
व्यापाऱ्यांनी आल्याची नवे आणि जुने अशी प्रतवारी केल्याने किमतीत फरक फडतो. यामुळे शेतकऱ्यांना मोठे आर`थिक नुकसान होते हे निवेदनाद्वारे कार्यालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे. तसेच सातारा बाजार समितीनेही आल्याची प्रतवारी करु नये असा ठराव केला असून तो कार्यालयास प्राप्त झाला आहे. त्यामुळे आले प्रतवारीने शेतकऱ्यांचे नुकसान आणि व्यापाऱ्यातील संघर्ष यातून बाजार समितीचे कामकाज, शेतमालाचा लिलाव यावर विपरित परिणाम होऊ नये. यासाठी आवश्यक त्या उपायोजना कराव्यात, अशी सूचना उपनिबंधकांनी केली आहे. त्यामुळे आता प्रतवारी न करता आले विक्रीचा सरसकट निर्णय झाल्याचे स्पष्ट झाल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे.
जिल्हा उपनिबंधकांनी शेतकऱ्यांच्या असंतोषाची दखल घेत सर्व बाजार समित्यांना सरसकट आले खरेदीची सूचना केली आहे. आता सूचनांची अंमलबजावणी होण्यासाठी बाजार समित्यांनी दक्ष राहण्याची गरजेचे आहे. केवळ शासकीय कागद नाचविल्यास आणि सरसकट आले खरेदी न झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही. - अनिल पवार, राज्य प्रवक्ते स्वाभिमानी शेतकरी संघटना