सातारा : राजकीय दृष्ट्या संवेदनशील आणि धार्मिक दृष्ट्या सृजनशील असलेल्या सातारा तालुक्यातील जीहे येथून मराठा आंदोलकांना समर्थन देण्यासाठी ग्रामस्थांनी उपस्थिती लावली. विशेष म्हणजे आंदोलनस्थळावर जिहेकरांच्या भजनाने धार्मिक वातावरण तयार झाले.सकाळी जिहे गावातून दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक गाडीवर झेंडा आणि ग्रामस्थांच्या डोक्यावर टोपी परिधान केलेली ही पंधरा किलोमीटरची रॅली अकराच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचली. रोहित सावंत, गिरीश फडतरे, अमरसिंह फडतरे, विक्रमसिंह फडतरे, गौरव फडतरे, हेमंत सावंत, रामराव जाधव, केदार फडतरे, मुकेश फडतरे, बजरंग फडतरे, गणेश जाधव आदी ग्रामस्थ या रॅलीत सहभागी झाले होते.जीहे भजनी मंडळाची कमाल जिहे येथून आलेल्या ह. भ. प. भजनी मंडळाने आंदोलन स्थळावरील वातावरणात भक्ती भाव पेरला. विठ्ठल नामाचा गजर करत आंदोलकांना प्रोत्साहन देणारी भजने सादर करून भजनी मंडळाने अनोखा माहोल तयार केला.
सर्वधर्मसमभाव ही भावना जोपासून गेली अनेक दशके जिथे ग्रामस्थ एक दिलाने गावात राहिली आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गावातील विविध जाती धर्मातील ग्रामस्थांनी आपला सहभाग नोंदवत आरक्षणाला पाठिंबा दर्शवला आहे. - रोहित सावंत, जिहे ग्रामस्थ