सातारा : मुंबई-गोवा मार्गावरील एक लेन गणेशोत्सवापूर्वी तयार करणार असून सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पर्यटनास मोठा वाव आहे. त्यामुळे निसर्गाची हानी न करता पर्यटन विकास करण्यात येईल. त्याचबरोबर यापुढे कोणत्याही परिस्थितीत अनधिकृत बांधकाम होणार नाही याबाबत सूचना करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच करण्याबाबतही पत्रकारांना आश्वस्त केले.सातारा येथील शासकीय विश्रामगृहात मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तसेच पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरेही दिली. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार मकरंद पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलिस अधीक्षक समीर शेख, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी आदी उपस्थित होते. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रथम हेलिकाॅप्टरने सैनिक स्कूलच्या मैदानावर आगमन झाले. तेथील स्वागतानंतर ते विश्रामगृहात दाखल झाले.मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘मुंबई-गोवा महामार्गाबाबत मी स्वत: बैठक घेतली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वत: लक्ष घातले आहे. तसेच मंत्री रवींद्र चव्हाण हे कामावर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी एक लेन पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच मुंबई-सिंधुदुर्ग रस्ता हा ग्रीन फिल्ड करतोय. कोकणच्या विकासासाठी हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. त्याचबरोबर सातारा येथील तरुण नोकरीसाठी मुंबईला जातोय. येथे विकासाची मोठी क्षमता आहे. मोठ्या प्रमाणात क्लस्टर शेतीत लोकांना एकत्र आणत आहोत. बांबू लागवड मोठ्या प्रमाणात केली जाणार आहे. तसेच वनाैषधीवरही मोठ्या प्रमाणात काम करणार आहे.महाबळेश्वर हे जागतिक पर्यटनस्थळ आहे. तेथे रस्ते, पार्किंग करणार आहे. तसेच तापोळा हे मिनी काश्मीर आहे. बामणोली, वसोटा येथील पर्यटनासाठी जे काही करता येईल ते करणार आहे. कारण येथे पर्यटनाला मोठी संधी आहे. निसर्गाची कोणतीही हानी न करता पर्यटन विकास केला जाईल. त्याचबराेबर हे करताना कोणत्याही परिस्थितीत अनधिकृत बांधकाम होणार नाही, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केली आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. तसेच कोकणला साताऱ्याशी जोडण्यासाठी आणखी एक पूल मंजूर केल्याचेही त्यांनी सांगितले.पारोळ्याच्या पत्रकारावरील हल्ल्याचा प्रश्न उपस्थित केल्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकार हा लोकशाहीचा एक स्तंभ आहे. त्यांच्यावर हल्ला होता कामा नये. जो कोणी असेल त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट संकेत दिले. तसेच मंत्रिमंडळ विस्तारावर लवकरच एवढेच बोलून मुख्यमंत्री पुढे गेले.
मुख्यमंत्री प्रथमच सातारा शहरात...मुख्यमंत्री होऊन एकनाथ शिंदे यांना एक वर्ष होऊन गेले आहे. आतापर्यंत शिंदे हे अनेकवेळा जिल्ह्यात आले. पण, सातारा शहरात आले नव्हते. गुरुवारी प्रथमच ते सातारा शहरात आले. पण, शासकीय विश्रामगृहावर थोडावेळ थांबल्यानंतर ते कासमार्गे दरे या गावी निघून गेले. मुख्यमंत्री सातारा शहरात येणार म्हणून दुपारपासूनच पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.