सातारा : हरवलेला फोन मला दे, असे म्हणत एका पोलिस कर्मचाऱ्याची थेट गचुंडी धरून इतर पोलिसांना शिवीगाळ व दमदाटी करण्यात आली. ही घटना दि. ३० रोजी रात्री सव्वादोन वाजता बाॅम्बे रेस्टाॅरंट पुलाखाली घडली. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात दोघांवर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.विशाल नवनाथ चव्हाण (वय २९, रा. महागाव, ता. सातारा), सूरज उत्तम लोखंडे (वय ३०, शिवराज काॅलनी, गोडोली, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सातारा शहर पोलिस ठाण्यातील पोलिस काॅन्स्टेबल अमोल सापते हे सोमवारी रात्रपाळी ड्युटीवर होते. ११२ नंबरला वरील संशयितांनी फोन करून आमचा मोबाइल आणि पैसे चोरीला गेल्याचे सांगितले. त्यानंतर ११२ नंबरने या प्रकाराची माहिती बिटमार्शल अमोल सापते यांना दिली. सापते हे तातडीने त्या ठिकाणी गेले. त्यावेळी संशयितांनी उलट सापते यांनाच दमदाटी शिवीगाळ सुरू केली. हरवलेला फोन मला दे, नाहीतर तुला सोडत नाही, असे म्हणून त्यांची गचुंडी धरली. हा प्रकार वाढत गेल्याने काॅन्स्टेबल सापते यांनी सहायक पोलिस निरीक्षक पालवे यांना या घटनेची माहिती दिली. पालवे व चालक देवकर हे तेथे पोहोचले. यावेळी दोघांनाही शिवीगाळ, दमदाटी करून शासकीय कामात अडथळा आणला. पोलिस काॅन्स्टेबल अमोल सापते यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी दोघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला. हवालदार मोरे हे अधिक तपास करीत आहेत.
फोन हरविल्याने पोलिसाची धरली कॉलर, साताऱ्यातील घटना; दोन तरुणांवर गुन्हा
By दत्ता यादव | Published: October 31, 2023 6:37 PM