सातारा : एकसष्ठ वर्षीय वृद्ध सायंकाळी शेतातून घरी आले. नेहमीप्रमाणे जेवण केले. त्यानंतर रात्री झोपी गेले. मध्यरात्री डोके दुखायला लागले म्हणून झोपेतून उठले. डोक्याला बाम लावून पुन्हा झोपी गेले. सकाळी उठल्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, नेमो काय झाले हे समजले नाही. अखेर जेव्हा त्यांचा मृत्यू झाला तेव्हा समजले. त्यांना सर्पदंश झाला होता. वेळीच निदान झाले असते तर त्यांचा जीव वाचला असता.
साताऱ्यातील मंगळवार पेठेत राहणारे मारुती बापू लोहार (वय ६१) हे रविवारी आंबवडे खुर्द मानेवाडी येथे नातेवाइकांकडे गेले होते. सायंकाळी शेतातून काम करून ते घरी आले. नेहमीप्रमाणे त्यांनी जेवण केले. रात्री त्यांचे डोके दुखू लागल्याने डोक्याला बाम लावून ते पुन्हा झोपले. सकाळी उठल्यानंतर नातेवाइकांनी त्यांना साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथील डाॅक्टरांनी डोके दुखतेय म्हणून डोक्याचे एमआरआय केले. परंतु तरीही त्यांची प्रकृती खालावत चालली. त्यामुळे पुन्हा आणखी एका खासगी दवाखान्यात त्यांना नेण्यात आले. इथेही त्यांच्यावर उपचार सुरू झाले. काही वेळातच त्यांची अधिक प्रकृती बिघडू लागली. त्यामुळे त्यांना नातेवाइकांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले. येथे पोहोचण्यापूर्वीच त्यांचा वाटेत दुर्दैवी मृत्यू झाला. सिव्हिलमधील डाॅक्टरांनी त्यांना तपासले असता त्यांचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याचे समजले. मारुती लोहार यांना सर्पदंश झाल्याचे वेळीच निदान झाले असते तर त्यांचा जीव नक्कीच वाचला असता.
निदान झालं उशिरा..
मारुती लोहार यांच्या मृत्यूचं वेळीच निदान न झाल्याने नातेवाइकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पायाला किंवा हाताला सर्पदंश झाला असेल, मात्र त्यांना वेळीच समजले नाही.