सातारा : घर किंवा अपार्टमेंटमध्ये वास्तव्य करीत असलेले अनेक भाडेकरू आता स्वत:ला घरमालक समजू लागले आहेत. काही भाडेकरू तीस-चाळीस वर्षांपासून भाड्याच्या घरात वास्तव्य करीत असल्याने ते जागा सोडण्यास तयार नाहीत. अशी शेकडो प्रकरणे सध्या न्यायप्रविष्ट आहेत.
स्वत:चे उत्पन्न वाढविण्यासाठी शहरातील अनेक मिळकतदारांनी आपले घर किंवा प्लॅट भाड्याने दिले आहेत. मात्र, काही उपद्रवी भाडेकरू घरमालकांची डोकेदुखी ठरू लागले आहेत. अनेक वर्षांपासून वास्तव्य करीत असलेले काही भाडेकरू आता घर सोडायला तयार नाहीत. घर सोडलेच तर हक्क संपुष्टात येण्याची त्यांना भीती आहे. त्यामुळे मालक व भाडेकरू यांच्यातील वादाची प्रकरणे न्यायालयात प्रविष्ट आहे. त्यामुळे संबंधितांनी घर भाड्याने देण्यापूर्वी भाडेकरार नोंदणीकृत करून घेणे गरजेचे बनले आहे. अन्यथा अनेकांची फसवणूकही होऊ शकते.
(चौकट)
७८ प्रकरणे न्यायालयात
१. सातारा शहरातील अनेक मिळकती मालक व भाडेकरू यांच्या वादात अडकल्या आहेत.
२. जागा सोडल्यास हक्क संपुष्टात येईल या भीतीने अनेक भाडेकरू घर सोडायला तयार नाहीत.
३. गेल्या काही वर्षांपासून या वादाची ७८ प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत.
४. हाताच्या बोटावर मोजण्याइतकी प्रकरणे न्यायालयात निकाली लागली आहेत.
(चौकट)
घर बळकवल्याच्या तक्रारी
२०१९ - ९
२०२० - ११
२०२१ - ७
(चौकट)
घर भाड्याने देताना ही घ्या काळजी
- घर भाड्याने देताना भाडेकरार करून घ्यावा. प्रत्येक करार हा लिखित व नोंदणी स्वरूपात असावा. या करारात नियम व अटी भाडे रक्कम कराराचा कालावधी याचा उल्लेख असावा. भाडेकरार नोंदणीकृत असेल तरच न्यायालयात त्याची दखल घेतली जाते. स्टॅँपड्युटीसाठी येणार सर्व खर्च घरमालकाने करणे अपेक्षित आहे.
(कोट)
शहरातील काही मिळकती वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. हा वाद मालक व भाडेकरू यांच्यातील आहे. काही भाडेकरू घर सोडण्यास तयार नाही. त्यामुळे अशी फसवणूक टाळण्यासाठी मालकांनी नोंदणीकृत भाडेकरार करावा.
- अण्णासाहेब मांजरे, पोलीस निरीक्षक