कऱ्हाड : शहरातील मुख्य चौक व मार्गांवर महापुरुषांचे अर्धाकृती, पूर्णाकृती पुतळे आहेत. या पुतळ्यांमुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे; पण पुतळ्यांची स्वच्छता, निगा व सुरक्षा करण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. काही पुतळ्यांवर वाळलेले हार अनेक दिवसांपासून त्याच स्थितीत असतात. तर काही पुतळ्यांच्या परिसराची स्वच्छताही होत नाही.
कऱ्हाडातील महात्मा गांधींच्या पुतळ्याचा चष्मा चोरीस गेल्याची घटना घडली. अशा घटनांमुळे समाज स्वास्थ्य बिघडू शकते. त्यामुळे पुतळ्यांच्या देखभालीबरोबरच सुरक्षेबाबतही ठोस उपाययोजना होणे गरजेचे आहे. कऱ्हाडचा विचार करता शहरात सुमारे चौदा ठिकाणी महापुरूषांचे पुतळे आहेत. काही खासगी जागांमध्येही पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे. हे पुतळे शहराच्या सौंदर्यात भर घालत आहेत. पालिकेच्या अग्निशामक बंबाद्वारे काहीवेळा पुतळ्यांची स्वच्छता केली जाते. मात्र, त्यामध्ये सातत्य नसते. कधी-कधी आठवड्यात दोनदा पुतळे स्वच्छ केले जातात. तर कधी महिन्यात एकदाही पुतळ्यांवर पाणी मारले जात नाही.
काही ठिकाणी पुतळ्याच्या परिसरात गवत व झुडपे वाढली आहेत. ती काढण्याकडेही लक्ष दिले जात नाही. काही अर्धाकृती पुतळे कमी उंचीवर आहेत. त्याच्या सभोवताली उंच रेलिंगही लावण्यात आलेले नाही. त्यामुळे कोणीही सहजासहजी त्या पुतळ्यापर्यंत पोहोचू शकते, अशी परिस्थिती आहे. उत्सव, सण, समारंभाच्या निमित्ताने पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले जाते. मात्र, अर्पण करण्यात आलेले पुष्पहार वाळल्यानंतरही काढले जात नाहीत. त्यामुळे पुतळ्यांच्या सौंदर्याला बाधा पोहोचते.
- चौकट
महापुरुषांचे पुतळे
कोल्हापूर नाका : महात्मा गांधी
शाहू चौक : छत्रपती शाहू महाराज
दत्त चौक : छत्रपती शिवाजी महाराज
बसस्थानक : कर्मवीर भाऊराव पाटील
टाऊन हॉल : यशवंतराव चव्हाण
हौसिंग सोसायटी : छत्रपती शिवाजी महाराज
न्यायालयासमोर : डॉ. बापूजी साळुंखे
प्रभात टॉकिजसमोर : महात्मा ज्योतिबा फुले
आंबेडकर चौक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर
कन्या शाळेसमोर : वि. दा. सावरकर
पालिका आवार : छत्रपती शिवाजी महाराज
- चौकट
रात्रगस्तीवेळी पोलिसांचे लक्ष
शहरात ठिकठिकाणी पोलिसांच्या ड्यूटीचे ‘पॉइंट’ आहेत. त्यापैकी दत्त चौक व आंबेडकर चौकात दररोज रात्री पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक असते. इतर पुतळ्यांच्या ठिकाणीही रात्र गस्तीवरील पोलिसांचे लक्ष असते. रात्र गस्तीसाठी फिरणारे अधिकारी-कर्मचारी शहरातील पुतळ्यांना भेटी देतात.
- चौकट
नवीन पुतळ्यासाठी...
नवीन पुतळ्यांच्या मंजुरीसाठी अत्यंत कडक नियम आहेत. पुतळा समितीची स्थापना करून सुरुवातीला पालिकेकडे पुतळ्याची मागणी करावी लागते. त्यानंतर जिल्हा पोलीस प्रमुख व जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज द्यावा लागतो. तसेच नगरविकास विभागाचे आयुक्त, गृह विभागाचे आयुक्त, सामान्य प्रशासन विभागाचे आयुक्त आणि मंत्रालयाकडेही अर्ज करावा लागतो.
- चौकट
वडाप वाहनांचा विळखा
पुतळे दर्शनी ठिकाणी असल्यास त्याचे पावित्र्य राखण्याबाबत जागरूकता दाखविली जाते; पण कऱ्हाडात काही ठिकाणी चौकाच्या एखाद्या कोपऱ्यात अथवा रस्त्याकडेला पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे. संबंधित पुतळे सहजासहजी दृष्टीस पडत नाहीत. तसेच वडाप वाहनांचा परिसरात विळखा असतो.
- चौकट
सुरक्षेची जबाबदारी कोणाची?
पुतळ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी पालिकेची असल्याचे सांगण्यात येते. मात्र, ही जबाबदारी पुतळा समितीची असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. पुतळा समितीतील अनेकजण नियमावली पासून अनभिज्ञ आहेत. त्यामुळे पुतळ्यांची सुरक्षा करायची कुणी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.