सातारा : जिल्हा प्रशासनाने शहरी भागात ऑनलाइन पध्दतीने लसीकरण सुरू केले आहे. या निर्णयामुळे वयोवृद्ध व गोरगरीब जनता लसीकरणापासून वंचित राहणार आहेत. तरी जिल्हा प्रशासनाने ऑनलाइन प्रक्रिया रद्द करून शहरातील विविध ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करून नागरिकांचे ऑन दी स्पॉट लसीकरण करावे, अशी मागणी नगरसेवक सुहास राजेशिर्के यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, ‘शहरात वेगवेगळ्या ठिकाणी प्रशासनाकडून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली होती. या मोहिमेमुळे वयोवृद्ध नागरिकांची लसीकरणावेळी होणारी गैरसोय टळली होती; परंतु शासनाने शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असणारी लसीकरण मोहीम रद्द करून कस्तुरबा, गोडोली व जिल्हा रुग्णालयात ऑनलाइन पध्दतीने लसीकरण प्रक्रिया राबवण्यास सुरवात केली. परंतु शहरातील सर्व नागरिकांना ऑनलाइन प्रक्रिया जमतेच असे नाही. या किचकट प्रक्रियेमुळे सद्य परिस्थिती पाहता लसीकरण ठप्प झाल्याचे दिसून येते आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती पाहता सर्वांचे लसीकरण लवकर होणे गरजेचे आहे. यासाठी दि. ६ जुलै रोजी जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक सातारा यांना प्रभागात लसीकरण केंद्राची मागणी केली होती. परंतु शासनाने आजतागायत या मागणीची पूर्तता केली नाही.
ज्या नागरिकांना, वयोवृद्ध लोकांना ऑनलाइन प्रक्रिया जमणार नाही अशा लोकांसाठी शहरात लसीकरण केंद्र सुरू करून जागेवरच नोंदणी करून घ्यावी, अशी मागणी राजेशिर्के यांनी केली आहे. या मागणीला मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिल्याचे सुहास राजेशिर्के यांनी सांगितले.