सिद्धार्थ सरतापे ल्ल वरकुटे-मलवडीकाही दिवसांवर आलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी कुकुडवाड गटातील उमेदवारीचा केंद्रबिंदू वरकुटे मलवडीतच असणार आहे. त्यामुळे या गावाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. सध्या वरकुटे मलवडी परिसरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. इच्छुक असणारे अनेक पक्षांत चाचपणी करताना दिसून येत आहेत. माण तालुक्यातील वरकुटे मलवडी हे गाव राजकीयदृष्ट्या अग्रेसर आहे. कारण जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सदस्य मिळविणारी एक ना अनेक नेते या गावात आहेत. परंतु अलीकडील काळात राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कुकुडवाड गटात यावेळी मात्र राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, भाजप, रासप व इतर पक्षांनी चांगलाच चंग बांधला आहे. इच्छुक उमेदवारांची सर्वच पक्षांतून चाचपणी सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक रंगतदार होणार हे स्पष्ट दिसत आहे.कुकुडवाड गटात सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षण आहे. या गटातील निवडणुकीसाठी भाजपकडून सुरेखा शिंदे, राष्ट्रवादीकडून सुवर्णा देसाई, अपर्णा देसाई, संगीता जगताप, माधुरी जगताप आदी तसेच काँग्रेसकडून ज्योती जगताप, सविता जगताप, सुनीता माने, शिवसेनेकडून मेघा जगताप तर रासपकडून उमेश जगताप यांच्या पत्नीचे नाव समोर येत आहे. वरकुटे मलवडी गणासाठी आरक्षण ओबीसी प्रवर्गातील महिलेसाठी आहे. या गणातून चंद्राबाई आटपाडकर, नंदा काळेल, कविता खरात, सुवर्णा शिंगाडे, स्मिता खिलारी, स्नेहल आटपाडकर यांच्यासह अनेकांची नावे समोर येत आहेत. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत कुकुडवाड गटातून राष्ट्रवादीचे शिवाजीराव शिंदे तर वरकुटे मलवडी गणातून वसंतराव जगताप हे निवडून आले होते. परंतु सध्या परिस्थिती विचित्र आहे. शिवाजीराव शिंदे यांनी राष्ट्रवादीशी फारकत घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तेव्हापासून स्थानिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची फरफटच पाहायला मिळाली आहे. (वार्ताहर)
उमेदवार वरकुटे मलवडीचेच राहणार !
By admin | Published: January 04, 2017 10:24 PM