कऱ्हाड : ‘कृष्णा फाउंडेशनने ‘मनस्विनी’च्या माध्यमातून महिलांसाठी सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. यामुळे महिलांना जीवनातील उद्याच्या स्पर्धेला समर्थपणे सामोरे जाण्याचे बळ मिळाले आहे,’ असे मत डॉ. तारा भवाळकर यांनी व्यक्त केले. वाठार, ता. कऱ्हाड येथे आयोजित कार्यक्रमामध्ये त्या बोलत होत्या. यावेळी प्रा. मनीषा थोरात, प्रा. संध्या शेंडगे, प्रा. परिणिता चव्हाण, प्रा. दीपाली पाटील, प्रा. सुलोचना पाटील, प्रा. सीमा पाटील, प्रा. विभावरी जगदाळे, प्रा. आरती चतुर्वेदी, प्रा. अप्सरा मुजावर, प्रा. अपर्णा सोमदे, प्रा. मनीषा पाटील, प्रा. धनश्री माळी, भाग्यश्री यादव आदी उपस्थित होत्या. डॉ. भवाळकर म्हणाल्या, ‘स्त्रियांनी आपले स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची कास धरावी. कालच्या काळातील जात्यावरती ओवी गाणाऱ्या स्त्रीपेक्षा आजच्या युगातील अनेक पदवी घेतलेल्या स्त्रिया कालच्या युगातील स्त्रियांच्या बौद्धिकदृष्ट्या असक्षम ठरत आहेत. यातून बोध घेत उद्याच्या युगातील मातृत्वाचे आव्हान स्वीकारावे व स्त्री स्वावलंबनाचा अट्टाहास करावा.’ सौंदर्यतज्ज्ञ सुलभा सूर्यवंशी म्हणाल्या, ‘कोणत्याही स्त्रिला सौंदर्याचे आकर्षण राहत असून, चेहऱ्यावरचे सौंदर्य महत्त्वाचे असूनही मनाचे व त्याचबरोबर व्यक्तिमत्त्वाचे सौंदर्य असणे ही गरज आहे. त्यासाठी आवश्यक शैक्षणिक व सांस्कृतिक ज्ञान स्त्रियांनी जोपासावे. यावेळी सुलभा सूर्यवंशी यांनी उपस्थित महिलांसमोर सौंदर्य वाढविणे व ते टिकविणे यासाठी आवश्यक उपाय व त्याची विविध प्रायोगिक प्रात्यक्षिके करून दाखविली व उपस्थित माहिला समुदायाकडून दाद मिळविली. कार्यक्रमाचे सीमा मांडवे व सुप्रिया शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी कोमल मोहिते यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
‘मनस्विनी’ महिलांसाठी सक्षम व्यासपीठ
By admin | Published: March 11, 2015 9:49 PM