सातारा : पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या गाडीला ओव्हरटेक करून वेगात पुढे निघालेल्या कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार वीज वितरणच्या पोलवर जोरदार धडकली. यामध्ये तीन युवक जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दरम्यान, एअर बॅग उघडल्याने चालकाचे प्राण वाचले असल्याचे समोर आले आहे. प्रणव कुलकर्णी, सुरज मगर, कुमार जलवाणी (सर्व रा. सातारा) हे तिघे कारमधून कनिष्क मंगल कार्यालयाच्या बाजूने बसस्थानकाकडे निघाले होते. याचवेळी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते या पोलीस परेड मैदानावर निघाल्या होत्या. त्यांच्या गाडीला ओव्हरटेक करून कार (एमएच ११ बीएस ६८३१) वेगात पुढे गेली.
रिमांडहोमजवळ अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट रस्त्याच्याकडेला असलेल्या वीज वितरणच्या पोलवर जोरदार धडकली. वेळीच एअर बॅग उघडल्याने चालकाचे प्राण वाचले. या कारमधील तिघेही गंभीर जखमी झाले. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी तत्काळ गाडीतून खाली उतरून आपल्या सहकार्यांच्या मदतीने जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.