पाचगणी: येथील हरिसन फॉलि थापा येथून मुंबईतील पर्यटक दाम्पत्याची कार सुमारे चारशे फूट दरीत कोसळल्याची घटना रविवारी रात्री साठेआठच्या सुमारास घडली. जखमी पतीला बाहेर काढण्यात यश आले असून, पत्नीचा शोध घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पाचगणीतील हरीसॅन फॉलि थापा या ठिकाणी फिरावयास मुंबईतील एक दाम्पत्य आले होते. चालकाचा अचानक कार वरील ताबा सुटल्याने कार थाप्यावरील खोल दरीत चारशे फूट कोसळली.
या अपघाताची माहिती समजताच महाबळेश्वचे पोलीस निरीक्षक कोंडुबैरी व कर्मचारी, तसेच पांचगणी पोलीस ठाण्याचे कर्मचारी, महाबळेश्वर येथील सह्यादी टेकर्स, वाई पोलीस असा सारा फौजफाटा घटनास्थळी तत्काळ दाखल झाला. या सर्वांनी मिळून दरीत मदत कार्यास सुरूवात केली.
खोल दरीत उतरून उमेद बिलाल खटाव (वय ३५) यांना बाहेर काढण्यात यश आले. खटाव यांना पाचगणीतील बेलअर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर पत्नी सना उमेद खटाव (वय ३२) यांना दरीतून शोधण्याची मोहीम रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा पाटील, तसेच महसूल विभागातील सर्व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. अत्यंत अवघड अशी दरी असल्यामुळे मदतकार्यात अडथळे येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.