सातारा : उतारावर उभी केलेली कार अचानक सुरू झाल्याने नागरिकांची एकच धांदल उडाली. ही विनाचालक कार सुमारे पाचशे फूट धावत गेल्यानंतर एका दुचाकीस्वाराला धडक देऊन ट्रकवर आदळली. यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला असून, हा थरार येथील पोवईनाक्यावर शनिवारी दुपारी एकच्या सुमारास घडला.पोवईनाक्यावर सैनिक बँकेसमोरील तीव्र उतारावर एक कार चालक गाडी उभी करून मित्राला लग्नपत्रिका देण्यासाठी गेला. काही क्षणातच कार रस्त्यावरून धाऊ लागली. कारमध्ये चालक नसल्याचे काही नगारिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी आरडाओरड करण्यास सुरूवात केली.
वाढे फाट्याकडून येणाऱ्या वाहन चालकांनी समोरून कार येत असल्याचे पाहून पाठीमागे वाहने घेतली. उतारावर असल्यामुळे त्या कारचा वेग अचानक वाढला होता. डाव्या बाजूने निघालेली कार अचानक उजव्या बाजूला वळली.
त्यामुळे समोरून येणाऱ्या एका दुचाकीस्वाराला जोरदार धडक देऊन पुन्हा ती कार उभ्या असलेल्या मालट्रकवर जाऊन आदळली. केवळ वीस ते पंचवीस सेकंदामध्ये हा थरार घडला. काही नागरिकांनी भितीने वाहने रस्त्यात सोडून आपला जीव वाचविण्याचा प्रयत्न केला.कारच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या नागरिकाला तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. जमावाला पांगवून रस्त्यावर असलेली कार पोलिसांनी बाजूला केली. त्यानंतर वाहतूक पुर्ववत झाली. उतारावर कार उभी करताना चालकाने हँडब्रेक लावला नव्हता. त्यामुळे कार सुरू झाली असावी, अशी शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.