माणिक डोंगरेमलकापूर : भरधाव कारची दुचाकीला धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील सुट्टीवर आलेला सैन्यदलातील जवान ठार झाला. तर एक युवक गंभीर जखमी झाला. पुणे-बंगळूर आशियायी महामार्गावर येथील मळाईदेवी पतसंस्थेसमोर आज, बुधवारी सकाळच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. नितीन मोहन शेवाळे (वय २१ रा. उंडाळे शेवाळेवाडी नं. १ ता. कराड) असे अपघातात ठार झालेल्या सैन्यदलातील जवानाचे नाव आहे. तर प्रथमेश दिपक शेवाळे (१९ रा. उंडाळे शेवाळेवाडी नं. १ ता. कराड) असे गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.अपघातस्थळावरून व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नितीन शेवाळे हे भारतीय सैन्यदलात सेवा बजावत होते. ते सुट्टीसाठी गावी शेवाळेवाडी येथे आले होते. त्याच्या चुलत भावाला रुग्णालयात बघण्यासाठी ते दुचाकी (क्रमांक एम एच ५० एफ ३८८०) वरून रूग्णालयात येत होते. पुणे-बंगळूर महामार्गावर मळाईदेवी पतसंस्थेसमोर त्याच्या दुचाकीला पाठिमागून पुण्याच्या दिशेने निघालेल्या भरधाव कार (क्रमांक एम एच १२ सी के १२३९) ची जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार दोघेही महामार्गावरच फरपटत गेले. त्यात ते दोघेही गंभीर जखमी झाले. अपघातानंतर परिसरातील नागरिक व युवक अपघातस्थळी धावले. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग डी पी जैन विभागाचे कर्मचारी दस्तगीर आगा यांनी कराड शहर पोलिसांसह महामार्ग पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच कराड शहर पोलीस ठाण्याचे हवालदार खलील ईनामदार व प्रशांत जाधव यांच्यासह कर्मचारी व महामार्ग पोलिस तातडीने घटनास्थळी दखल झाले. जखमींना रूग्णवाहिकेने कृष्णा रूग्णालयात दाखल केले. मात्र जवान नितीन शेवाळे यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तर जखमी युवकावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. जवान शेवाळे यांच्या मृत्यूची माहिती मिळताच संपूर्ण शेवाळेवाडी गावावर शोककळा पसरली. कराड शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी ए ए ईनामदार व प्रशांत जाधव यांनी अपघातस्थळाचा पंचनामा केला. अपघातग्रस्त वाहने बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते.
भरधाव कारची दुचाकीला पाठिमागून धडक, सुट्टीसाठी गावी आलेल्या सैन्यदलातील जवानाचा अपघातात मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 12:04 PM