दहिवडी (सातारा) : ‘प्रत्येक भागाचे वैशिष्ट असते. माण, खटावचा भाग हा दुष्काळी. आता या दुष्काळी तालुक्यांची ओळख पुसण्याचा प्रयत्न माणदेशी जनता श्रमदानातून करीत आहे. तुमच्या घामाची काळजी आहे. यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन दिला जाईल,’ अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.
माण तालुक्यात वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने गावोगावी श्रमदान सुरू आहे. लोकांच्या श्रमदानामुळे प्रभावित होऊन पवार यांनी रविवारी सकाळी नरवणे येथे भेट दिली. यावेळी ते बोलत होते. कोकण विभागाचे माजी आयुक्त प्रभाकर देशमुख, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाष नरळे, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, माजी आमदार प्रभाकर घार्गे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, सभापती संदीप मांडवे, माणचे सभापती रमेश पाटोळे, ज्येष्ठ नेते वाघोजीराव पोळ, जिल्हा परिषद सदस्या डॉ. भारती पोळ, सोनाली पोळ, पंचायत समिती सदस्य विजयकुमार मगर, तानाजी कट्टे, डॉ. संदीप पोळ, मनोज पोळ, तालुकाध्यक्ष विलास सावंत, पिंटू जगताप, युवराज सूर्यवंशी, सुनील पोळ, सुरेंद्र मोरे, कविता म्हेत्रे आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘कष्ट करत व वर्गणी देऊन तुम्ही गावाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी श्रमदानात सहभागी झालात. राजकारण, मतभेद, संघर्ष बाजूला ठेवून गावाच्या विकासासाठी काम सुरू केले आहे, ही बाब कौतुकास्पद आहे.’
उरमोडीचे पाणी पाहून समाधान...
'राष्ट्रवादीच्या भूमिकेमुळे दुष्काळी माण आणि खटावला वरदायिनी ठरणाऱ्या उरमोडीच्या पाणी योजनेला गती दिली. अजित पवार, रामराजे नाईक-निंबाळकर व सुनील तटकरे हे मंत्री असताना उरमोडीला गती मिळाली. हे पाणी पाहून समाधान वाटले,’ असेही शरद पवार यावेळी म्हणाले.