बाकड्यांची मोडतोड
कऱ्हाड : येथील पालिकेने शहरात ठिकठिकाणी बसवलेली सिमेंटची बाकडी तुटली आहेत. त्यामुळे स्थानिकांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. बाकडी तुटल्याने ज्येष्ठ नागरिकांना बसण्याची सोय नाही. बाकडे तातडीने बदलण्याची मागणी होत आहे. काही बाकडे तुटल्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत. याबाबत पालिकेने योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.
विनामास्क प्रवास (फोटो : १७इन्फो०१)
रामापूर : येथील आगारातून लांब पल्ल्याच्या व ग्रामीण भागातील एसटी सेवा सुरू झाल्या आहेत. एसटीमधून प्रवास करताना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, अनेक प्रवासी विनामास्क प्रवास करताना आढळत आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका निर्माण होत आहे. विनामास्क प्रवास करणाऱ्या प्रवाशांमुळे इतरांना धोका निर्माण होत असून, शासनाकडून वारंवार सूचना करूनही प्रवासी याकडे दुर्लक्ष करीत आहेत.
विहीर धोकादायक
तांबवे : किरपे ते येणके रस्त्यावर येणके हद्दीत असलेली विहीर धोकादायक ठरत आहे. ही विहीर रस्त्याच्या कडेला असून, संरक्षक कठडेही बांधण्यात आलेले नाही. याशिवाय सूचना फलकही लावलेले नाही. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. रात्रीच्या वेळी या मार्गावरून जाताना दुचाकीचालकांची फसगतही होत आहे. या विहिरीबाबत संबंधित विभागाने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी वाहनधारकांसह प्रवाशांतून केली जात आहे.
रानडुकरांचा धुमाकूळ (फोटो : १८इन्फोबॉक्स०१)
कुसूर : विंग, ता. कऱ्हाड येथे रानडुकरांनी पिकांना लक्ष्य केले आहे. विशेषत: येथील डोंगर पायथा परिसरात उभ्या पिकांत कळपा कळपाने त्यांचा धुडगूस सुरू आहे. रातोरात पिके फस्त होऊ लागली आहेत. तोंडचा घास हिरावून नेल्यासारखी स्थिती येथील शेतकऱ्यांची झाली आहे.