सातारा : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील लिंबखिंडनजीक भरधाव कारने दिलेल्या भीषण धडकेत दुचाकीवरील सख्ख्या बहिणींचा जागीच करुण अंत झाला, तर मैत्रीण गंभीर जखमी झाली. हा अपघात शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास झाला. नजराणा हुसेन मुलाणी (वय २२), मुस्कान हुसेन मुलाणी (२०) अशी अपघातात ठार झालेल्या बहिणींची नावे असून, मयूरी अप्पा गायकवाड (२१, तिघीही रा. जनाई-मळाई हौसिंग सोसायटी, कोडोली, सातारा) असे जखमी मैत्रिणीचे नाव आहे. लिंबखिंडनजीक नुकत्याच सुरू झालेल्या एका नव्या मॉल कंपनीमध्ये मुस्कान आणि मयूरीला मुलाखतीसाठी बोलाविण्यात आले होते. या दोघींना दुचाकी चालविता येत नसल्याने मुस्कानची मोठी बहीण नजराणा हिला घेऊन तिघीजणी दुचाकीवरून तिब्बल सीट कंपनीकडे निघाल्या होत्या. लिंबखिंडनजीक महामार्ग ओलांडत असताना पुणे बाजूकडून आलेल्या भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, तिघीही गाडीवरून दूरवर फेकल्या गेल्या. यामध्ये मुस्कान आणि नजराणा यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. त्यामुळे अधिक रक्तस्राव झाल्यामुळे दोघींचा जागीच मृत्यू झाला. मयूरीच्या हातापायाला गंभीर जखम झाली. अपघातानंतर काही वेळातच इतर नागरिकांनी तिघींनाही तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. कारचा चालक संग्राम अशोक समेळ (रा. ठाणे) हा त्याच्या मित्रासह कोल्हापूरला लग्न समारंभासाठी निघाला होता. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, सातारा तालुका पोलीस ठाण्यात या अपघाताची रात्री उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती. (प्रतिनिधी) ‘त्यांची’ स्वप्नं अधुरीच! - मुस्कान आणि नजराणा या दोघी बहिणींच्या वडिलांचे पाच वर्षांपूर्वी निधन झाले आहे. आई औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीत काम करते. आई नोकरी करीत असली तरी या दोघी छोटी-मोठी नोकरी करून आईला आर्थिक हातभार लावत होत्या. त्यांचा लहान भाऊ नऊ वर्षांचा आहे. - म्हणूनच कायमस्वरूपी नोकरीसाठी त्या बऱ्याच प्रयत्न करीत होत्या. ‘कंपनीत नोकरी लागली की, आपण सर्वजण मिळून पैसे साठवू,’ असं स्वप्न मुस्कान घरात बोलताना व्यक्त करायची; मात्र नियतीला हे मान्य नसावे. नोकरीचे स्वप्न पूर्ण होण्यापूर्वीच मुस्कान आणि तिची बहीण नजराणावर काळाने घाला घातला. आपल्या मुलींचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने आईला मानसिक धक्का बसला आहे.
कारच्या धडकेत सख्ख्या बहिणींचा करुण अंत
By admin | Published: January 03, 2016 12:44 AM