सातारा : सातारा पालिकेने नोटीस दिल्यानंतरही अनधिकृत बांधकाम न हटविल्याने तिघांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पालिकेच्या भाग निरीक्षकांनी फिर्याद दिली आहे.
विपुल विनोदराव शहा, शिवाजी वसंत भोसले (रा. सदर बझार, सातारा), उज्ज्वल कुमार गोविंदराव राठी (रा. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सदर बझारमधील सिटी सर्व्हे नं. ४९९/२ या मिळकतीमध्ये अनधिकृत बांधकाम हटविण्याबाबत पालिकेच्या वतीने संशयितांना नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, नोटीस दिल्यानंतरही त्यांनी पत्रा शेडचे बांधकाम हटविले नाही. संशयितांनी महाराष्ट्र प्रादेशिक अधिनियमचे उल्लंघन केल्याने सातारा पालिकेचे भाग निरीक्षक श्रीकांत गोडसे यांनी त्यांच्याविरोधात फिर्याद दिली.
दुसरी फिर्याद सिटी सर्व्हे ४९७/ अ,९,२ यासंदर्भातली आहे. संशयित राठी यांना या जागेवरील बांधकाम बेकायदेशीर व्यावसायिक वापर बंद करण्यासाठी नोटीस बजावली होती. मात्र, त्यांनी व्यावसायिक वापर बंद केला नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधातही भाग निरीक्षक श्रीकांत गोडसे यांनी फिर्याद दिली. या दोन्ही घटनांची सातारा शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.