सातारा : फलटण तालुक्यातील उसाच्या फडात गर्भलिंगनिदान चाचणीसाठी गेलेल्या संशयित महिलेने बेकायदेशीररीत्या गर्भपात केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी वाई पोलिस ठाण्यात त्या महिलेसह तिघांवर वैद्यकीय गर्भपात अधिनियमांतर्गत विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फलटण तालुक्यातील उसाच्या फडात गर्भलिंगनिदान होत असल्याचे ‘लोकमत’ने स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून समोर आणले. या महिलेच्या सखोल चाैकशीतून गर्भलिंगनिदान चाचणीच्या रॅकेटपर्यंत पोहोचण्यास पोलिसांना आता नक्कीच यश येणार आहे. आरोग्य विभागाने केलेल्या चाैकशीत ही धक्कादायक माहिती समोर आली. संबंधित महिला ज्या कारने गर्भलिंगनिदान चाचणीसाठी फलटणला गेली त्या कारचालकाने आरोग्य विभागाला लेखी जबाब दिला. किती तारखेला, किती वाजता फलटणला गेले, याची सविस्तर माहिती त्याने दिली. गाडीत बसल्यानंतर गर्भलिंगनिदानसाठी जात असल्याचे त्या कारचालकाला समजले. यासह अन्य गोपनीय माहिती त्याने जबाबात दिली, तसेच आरोग्य विभागानेही संबंधित महिलेच्या माहेरी आणि सासरी चाैकशी केल्यानंतर संशयास्पद बाबी त्यांच्या निदर्शनास आढळून आल्या. त्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. युवराज करपे यांनी गुरुवारी वाई पोलिस ठाण्यात संबंधित महिला तिची जवळची व्यक्ती आणि तिसऱ्या अनोळखी व्यक्तीवर बेकायदेशीर ठिकाणी गर्भपात करवून घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असून, या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाणे गरजेचे आहे. पोलिस, आरोग्य, तसेच महसूल विभागाने समन्वय साधून या प्रकरणाचा पुढील तपास करावा. जेणेकरून भविष्यात असे प्रकार घडणार नाहीत आणि यापूर्वी झालेले प्रकार उघडकीस येतील. -डाॅ. राधाकिशन पवार, आरोग्य उपसंचालक, पुणे