लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : रानात म्हैशी चरायला सोडल्याने चिडून हल्ला केल्यानंतर मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी रमेश उर्फ बाळू बाजीराव मोरे (रा. अंबेदरे, मोरेवाडी ता. सातारा) याला पहिले अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. एल. मोरे यांनी चार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.
ज्ञानदेव गोपाळ मोरे (वय ६५, रा. अंबेदरे) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या खटल्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी, १३ ऑगस्ट २०१६ रोजी अंबेदरे येथील रानात ही घटना घडली होती. ज्ञानदेव मोरे हे म्हैशी चारत होते. यावेळी रानात म्हैशी चरायला सोडल्याचा राग रमेश मोरे याला आला व त्याने ज्ञानदेव यांच्यावर विळ्याने हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एल. जाधव यांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
न्यायालयात सरकार व बचाव पक्षाच्यावतीने युक्तिवाद करण्यात आला. सरकार पक्षाचे वकील अॅड. एन. डी. मुके यांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायाधिशांनी आरोपी बाळ मोरे याला चार वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास साधी कैद अशी शिक्षा ठोठावली. महिला पोलीस हवालदार शुभांगी भोसले यांनी सरकार पक्षाला सहकार्य केेले.